
पणजी : काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण व्हावा आणि काजूला दर्जा प्राप्त करून देण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस कांपाल पणजी येथे गोवा वनविकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या काजू महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला हा काजू महोत्सव लक्षवेधी ठरला. पर्यटकांचा प्रतिसाद, स्टॉल्स व इतर खाद्यपदार्थांची मेजवानी आणि मनोरंजन यामुळे पहिला काजू महोत्सव खऱ्या अर्थाने अभूतपूर्व झाला. काजू महोत्सवातून राज्यातील लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडले. यापुढे हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जाईल. त्यामुळे काजू उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी यावेळी व्यक्त केला. दरवर्षी हा महोत्सव विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनिशी आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ व काजूचा दर्जा प्राप्त होणे होता.या महोत्सवात काजूला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळवून देणे हा आहे असे त्या पुढे म्हणाल्या. महोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कष्टकरींचे 50 हून अधिक स्टॉल्स होते. अधिकाअधिक काजू उत्पादक व अन्य घटकांना यात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महोत्सवात 50 हून अधिक काजूशी निगडित स्टॉल्स थाटण्यात आले होते. काजू, निरो, फेणी स्टॉल लक्षवेधी ठरले. तसेच गोव्यातील महिला मंडळ, स्वयं सहाय्यक, हँडलूम, वेगवेगळे मसाले, कुंभार त्याचबरोबर अन्य स्टॉल्सच्या माध्यमातून काजूचे महत्व आणि उपयोगाबद्दल माहिती, प्रात्यक्षिके, ग्रामीण भागातील महिला व काजू लागवड करणारे शेतकरी, त्यांचेच सर्वांधिक स्टॉल्स येथे पाहायला मिळाले. एकाच छताखाली काजू महोत्सव, खाद्य पदार्थ, आणि मनोरंजन याचा आस्वाद येथे येणाऱ्यांनी घेतला अगदी डीजेच्या तालावर अनेकांनी ठुमके लावण्याचाही आनंद लुटला. मनोरंजनाप्रमाणे शेतीविषयक विविध माहिती या महोत्सवातून देण्यात आली. याशिवाय या महोत्सवात काजू फेणी खास आकर्षण ठरली. काजू फेणीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून द्यावा अशी मागणी महोत्सवात करण्यात आली. काजू बोंडापासून फेणी कशी केली जाते याविषयी माहिती देणारी दालनांचाही यात समावेश होता.









