रेल्वेमंत्री वैष्णव यांची मोठी घोषणा ः 199 स्थानकांना मिळणार आधुनिक रुप
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी अहमदाबाद दौऱयात बुलेट ट्रेनवरून मोठी घोषणा केली आहे. देशात पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कार्य सध्या सुरू आहे. 199 रेल्वेस्थानकांना जागतिक दर्जा मिळवून देण्यावर सध्या काम सुरू असून यांतर्गत अहमदाबाद रेल्वेस्थानकाला अत्याधुनिक स्वरुप मिळणार असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे.
देशात सध्या सर्व रेल्वेमार्ग हे जमिनीवर असल्याने गुरांची समस्या कायम राहते. परंतु अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी रेल्वेंच्या डिझाइनमध्ये बदल केले जात आहे. गुरुवारी म्हशीच्या धडकेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान झालेले नाही. पुढील हिस्स्याच्या दुरुस्तीनंतर संबंधित रेल्वे पुन्हा धावू लागल्याचे वैष्णव यांनी सांगितले आहे.
मुंबईहुन गांधीनगरच्या दिशेने जाणाऱया वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी अहमदाबादपूर्वीच्या बटवा आणि मणिनगरदरम्यान एक म्हैस धडकली होती. या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नव्हती. परंतु रेल्वेचा समोरील हिस्सा तुटला होता. गुजरातमध्ये 5जी लॅबची निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा वैष्णव यांनी अहमदाबाद येथे बोलताना केली आहे. देशात 5 जी तंत्रज्ञानाने युक्त 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यातील किमान 12 प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल तर अन्य प्रयोगशाळांचा वापर नव्या प्रयोगांसाठी केला जाणार आहे.









