चार दिवसापासून नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर : आगीचे ठिकाण शोधण्यासाठी मॅग्नेटिक फिल्डचा वापर
वाळपई : सत्तरी तालुक्यातील देरोडे डोंगरावर अजूनही आग धुमसत आहे. ही आग विझवण्यासाठी वन खात्याचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. आजही जोरदार वाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला. नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझविण्यात आली. तरीसुद्धा आगीचा वणवा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. वन खात्याचे एकूण 30 कर्मचारी देरोडे डोंगरावर तैनात करण्यात आलेले आहेत. गेल्या आठ दिवसापासून देरोडे डोंगराला आगीच्या झळा बसत आहेत. ती विझविण्यासाठी वन खात्याचे कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आटोकट प्रयत्न केले. यामुळे जास्त प्रमाणात आग विझविण्यात आलेली आहे.
वाऱ्यामुळे सातत्याने उडतो आगीचा भडका
दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून जोरदार वारा वाहत आहे. या वाऱ्यामुळे विझलेली आग पुन्हा फोफावत आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात सुकी लाकडे आहेत. त्यामुळे आग लगेच पेट घेत आहे. काही झाडांच्या ओंडक्यांमधील आगीची धग पूर्णत: विझलेली नाही. भर दुपारी उष्ण वाऱ्यामुळे ती पुन्हा पेट घेऊन वणवा पेटत असून त्याचे दुष्परिणाम जैविक संपत्तीवर होत आहेत. त्यात देरोडे डोंगर उभा आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला लागलेल्या आगीच्या कांड्या खालच्या भागातील सुक्या लाकडांवर पडत असल्यामुळे सतत वणवा पेटत असल्याची माहिती माहिती वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. गेल्या चार दिवसापासून देरोडे भागातील ग्रामस्थ डोंगरावर जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र या डोंगरावर अनेक ठिकाणी अडचणी आहेत. या अडचणीवर मात करणे अशक्य आहे. उभा डोंगर असल्यामुळे चढता येत नाही. आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचायला वेळ लागत आहे. तरीसुद्धा ग्रामस्थ, वनखात्याचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा कऊन आग विझवत आहेत.
नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर
ज्या ठिकाणी आग अजूनही धुमसत आहे ती विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अयशस्वी ठरला. शेवटी नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करून ही आग विझविण्याच प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसापासून हा प्रयत्न जारी आहे. आजही दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घनदाट जंगल, मोठ्या दगडांमुळे अडचणी : अपवनपाल आनंद जाधव
यासंदर्भात उपवनपाल आनंद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपासून सुक्या लाकडांमध्ये अजूनही आग धुमसत आहे. मात्र सदर ठिकाणी जाणे धोकादायक आहे. यामुळे नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या डोंगरावर घनदाट जंगल आहे. यामुळे निश्चित आग कुठे आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. सदर ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. या डोंगराच्या पायथ्याशी व सभोवतालच्या भागामध्ये वनखात्याच्या 30 कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आलेले आहे. या कर्मच्रायांकडून जे करणे शक्य आहे ते करण्यात येत आहे. मात्र ज्या ठिकाणी कर्मचारी पोहचू शकत नाही त्या ठिकाणी नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आनंद जाधव यांनी सांगितले.
बुधवारी आणखी कर्मचारी तैनात करणार
बुधवारी आणखीन कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या सहकार्याने आग लागलेल्या ठिकाणी जाणे जाणे शक्य आहे ते जाऊन आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. संपूर्णपणे आग विझविल्यानंतर तेथे पुन्हा आग भडकणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात देरोडे भागातील ग्रामस्थांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. बुधवारी सुद्धा या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात देरोडे गावातील ग्रामस्थ सहभागी होणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
आगीचे ठिकाण शोधण्यासाठी मॅग्नेटिक फिल्डचा वापर
दरम्यान देरोडे डोंगर उभा आहे. यामुळे सदर डोंगरावर असलेली आगीचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र स्पष्टपणे आगीचे ठिकाण दिसत नाही. यामुळे सदर ठिकाणी जाण्यासाठी मॅग्नेटिक फिल्डचा वापर करण्यात येत असून या यंत्रणेचा वापर आगीचे ठिकाण शोधण्यासाठी होत असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली आहे. डोंगरावर मोठ मोठे दगड असल्यामुळे तिथे जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. यामुळे मॅग्नेटिक फिल्डचा वापर जास्त सोयीचे ठरत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.









