महाबळेश्वर :
शहरासह आसपासच्या परिसरात कुठे आग लागली तर अग्निशमन दलाच्या जवानांना आता भडकलेल्या आगीतही बेधडकपणे जाऊन आग विझवता येणार आहे. आगीच्या आपत्तीचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा. तसेच त्यांच्या क्षमता वर्धनासाठी, सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नगरपरिषदेस प्रॉक्सिमिटी सुट दिले आहेत. या सूटचे तसेच इतर अत्याधुनिक साहित्याचे प्रात्यक्षिक मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते नगरपरिषद कार्यालय प्रांगणात करण्यात आले. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते अशा घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पालिका अग्निशमक दल तातडीने घटनास्थळी धाव घेतो. अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांना आग लागलेल्या ठिकाणी प्रवेश करून आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे सहज शक्य व्हावे या उद्देशाने फायर प्रॉक्सिमिटी सूटची निर्मिती करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या खास व वैशिष्ट्यपूर्ण सूट सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून महाबळेश्वर नगरपरिषदेस सहा फायर सूट प्राप्त झाले आहेत. हा सूट परिधान करून फायरमन आग लागलेल्या भागात जाऊन ६० अंश सेल्सिअस तापमान असेल तरीही काम करू शकतो. यामध्ये हेलमेट, ग्लोव्हज, शर्ट, पॅट आणि गमबुटांचा समावेश आहे. तसेच लोखंड कट करण्यासाठी इलेक्ट्रिक कटर, पंप, ऑक्सिजन सिलेंडर, फायर एक्सटिग्विशर इत्यादी साहित्याचे प्रात्यक्षिक पालिकेच्या प्रांगणात यावेळी करण्यात आले. यावेळी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांचेसह वरिष्ठ लिपिक आबाजी ढोबळे, पालिका अभियंता मुरलीधर धायगुडे, कर निरीक्षक अमित माने प्रशांत म्हस्के लेखापाल, प्रमोद कुंभार स्वच्छता निरीक्षक व अग्निशमन विभाग कर्मचारी उपस्थित होते.
- अग्निशमन दल सक्षम
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास अत्याधुनिक व दर्जेदार साधने उपलब्ध झाल्यामुळे अग्निशमन दल कर्मचारी निर्भयपणे आणि सक्षमतेने आगीसारख्या आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करू शकतील.
– योगेश पाटील, प्रशासक तथा मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद








