10 हजार कोटींचे उद्दिष्ट गाठणार : जारकीहोळी
बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती कौतुकास्पद आहे. बँकेची आर्थिक बाजू भक्कम असून कमी क्याजदरामुळे नफ्याचे प्रमाण कमी असले तरी शेतकऱ्यांना 3,475 कोटींची कर्जे वितरण करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात बँकेने आघाडी मारली आहे. आगामी काळात 10 हजार कोटी ठेव संकलन करण्याचे उद्दिष्ट गाठणार असल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. ते बुधवारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन आप्पासाहेब कुलगुडे होते. जारकीहोळी म्हणाले, शेतकऱ्यांसह सर्व तऱ्हेचे कर्ज वितरण करीत जिल्हा बँकेने गरजूंना आर्थिक मदतीचे पाठबळ देत तत्परता दाखविली आहे. 31 मार्च 2025 पर्यंतच्या आर्थिक वर्षात 33.10 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. नफा कमी होण्यामागे व्याजदराचे प्रमाण कमी आहे. भावी काळात बँकेच्या प्रगतीचे विविध टप्पे असणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे बँकेच्यावतीने स्वागत करण्यात आले. बँकेच्या वार्षिक अहवाल वाचनात सीईओ एन. जी. कलावंत म्हणाले, बँकेचे शेअर भांडवल 303.11 कोटी आहे. राखीव निधी 375.87 कोटी, ठेवी 6087.05 कोटी, गुंतवणूक 2027.79 कोटी, तसेच कृषी कर्ज वितरण 3432 कोटी, कृषीत्तर 1874 कोटी व व्यक्तिगत कर्ज 586 कोटी असे एकूण 5892 कोटींची कर्जे वितरित केली आहेत. तर आर्थिक वर्षात बँकेला 33.10 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. अपेक्स बँकेकडून 1673.84 कोटींचे कर्जाची उचल केली आहे. बँकेचे खेळते भांडवल 8592 कोटी इतके आहे. सद्यस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
या बैठकीत बँकेच्यावतीने नव्याने स्वॅपमशिनचे उद्घाटन करून या मशिनच्या कामकाजाला यावेळी चालना देण्यात आली. या बैठकीला संचालक महांतेश दोडगौडर व आण्णासाहेब जोल्ले यांनी आपले मनोगत व्यक्त करुन बँकेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन सीईओ एन. जी. कलावंत यांनी केले तर सहाय्यक व्यवस्थपाक ए. सी. कलमठ यांच्या आभाराने बैठकीची सांगता करण्यात आली. बैठकीला बँकेचे उपाध्यक्ष सुभाष ढवळेश्वर, संचालक आण्णासाहेब जोल्ले, महांतेश दोडगौडर, अरविंद पाटील, गजानन, राजेंद्र अंकलगी, रत्ना मामनी, श्रीकांत धवन, शिवानंद ढोणी, पंचन्नगौडा द्यामनगौडर, निलकंठ कपलगुती, सतीश कडाडी, कृष्णा अनगौळकर, संजय अवकन्नावर यांच्यासह नियुक्त संचालक प्रवीण घाळी, शशिकांत हादीमनी उपस्थित होते. या बैठकीला सुमारे 4 हजार सभासदांनी उपस्थिती दर्शविली होती.









