बीसीसीआयकडून घोषणा : चेन्नईत होणार पहिला क्वालिफायर व एलिमिनेटर सामना
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
यंदाच्या आयपीएलमधील प्ले ऑफ, एलिमिनेटर व अंतिम सामना कधी व कोठे होणार, हे बीसीसीआयने जाहीर केले आहे. यंदाचे प्ले ऑफ व फायनल सामना 23 ते 28 मे या कालावधीत खेळवले जाणार असून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 28 मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना खेळला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या प्ले ऑफमधील पहिला क्वालिफायर व एलिमिनेटर सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर दुसरा क्वालिफायर व अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. अहमदाबाद सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवेल. बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.

तत्पूर्वी, चेन्नई येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 23 मे रोजी गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावरील संघात पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यात विजेता संघ थेट अंतिम फेरी प्रवेश करेल. 24 मे रोजी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघ एलिमिनेटर सामन्यात भिडतील. या सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होईल. त्यानंतर अहमदाबादमध्ये 26 मे रोजी पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ व एलिमिनेटरमधील विजेता संघ आमनेसामने येथील. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामना खेळेल.
दरम्यान आयपीएलच्या 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील सामने हे अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदाराबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला इथे आयोजित करण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.









