लोक कोणत्या प्रकारचे व्यवसाय शोधून काढतील आणि यश मिळवतील याचा काहीही भरवसा देणे अशक्य आहे. आपल्या व्यवसाय केंद्रांना, दुकानांना आणि खाद्यपेयगृहांना ग्राहकांच्या दृष्टीने आकर्षक बनविण्यासाठी व्यापारी अनेक अद्भूत आणि जगावेगळे मार्ग शोधून काढत असतात. याचेच एक उदाहरण सध्या अमेरिकेच्या ओहायो प्रांतात घडताना दिसून येत आहे. प्रांतात एक असे रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे, की ती संकल्पना जाणून आपला थरकाप होऊ शकतो.
या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला जगातील अत्यंत कुप्रसिद्ध अशा गुन्हेगारांनी मरण्यापूर्वी त्यांचा जो अंतिम आहार घेतला होता, तो मिळू शकतो. या रेस्टॉरंटमध्ये अशा खाण्याला योग्य अशी वातावरण निर्मितीही करण्यात आली आहे. सर्वत्र येथे भीतीने कापायला लावणाऱ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. या रेस्टॉरंटची सजावट अशा प्रकारेच करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर हे रेस्टॉरंट उघडण्यासाठी ज्या इमारतीची निवड करण्यात आली आहे, ती इमारतही अत्यंत जुनी, म्हणजे 1900 सालातील आहे. नेट थॉमसन नावाच्या व्यक्तीला ही संकल्पना सुचली आणि त्याने ती साकारली. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातही अशा प्रकारचे एक रेस्टॉरंट आहे. ही दोन्ही खाद्यपेयगृहे आता चांगलीच प्रसिद्ध झाली असून लोक येथे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
येथे कुख्यात गुन्हेगारांना मृत्यूदंड देण्यापूर्वी जो आहार देण्यात आला होता, तो तर मिळतोच, तसेच तो त्यांना ज्या प्रकारच्या भांड्यांमध्ये वाढण्यात आला होता, तशाच प्रकारच्या भांड्यांमधून दिला जातो. अनेक ग्राहकांनी हा अनुभव अत्यंत भयप्रद पण आकर्षक असल्याची प्रतिक्रिया येथे जाऊन आल्यानंतर दिली आहे.









