वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे बुधवारपासून दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यातील अंतिम सामन्याला प्रारंभ होत आहे. दक्षिण विभागाचे नेतृत्व हनुमा विहारीकडे तर पश्चिम विभागाचे नेतृत्व प्रियांक पांचाळकडे सोपवण्यात आले आहे.
दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पश्चिम विभागाने 34 वेळा अंतिम फेरी गाठली असून 19 वेळा दुलिप करंडकावर आपले नाव कोरले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पश्चिम विभागाचा संघ हा सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा दक्षिण विभागाचा संघ आता आपले या स्पर्धेतील 14 वे अंजिक्यपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण विभाग संघाला या सामन्यात गेल्या वर्षी झालेल्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभाग संघाकडून 294 धावांनी दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. अजिंक्य रहाणे सध्या विंडीज दौऱ्यावर कसोटी संघात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. मात्र भारतीय कसोटी संघातील मध्यफळीत खेळणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र विंडीज दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे. त्यामुळे तो आता पश्चिम विभाग संघातून खेळताना दर्जेदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेत मध्य विभागविरुद्धच्या उपांत्य सामन्यात चेतेश्वर पुजाराने 133 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. पुजाराने आतापर्यंत 103 कसोटीत 7 हजारापेक्षा अधिक धावा नोंदवल्या आहेत. पश्चिम विभागाला यावेळी जेतेपद मिळवून देण्यासाठी तो प्रयत्नांची शरथ करेल.
दक्षिण विभाग संघामध्ये उपकर्णधार मयांक अगरवाल, साई सुदर्शन, हनुमा विहारी, रिकी भुई, तिलक वर्मा तसेच वॉशिंग्टन सुंदर हे प्रमुख फलंदाज आहेत. साई किशोर, कविरप्पा, विशाख हे या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. पश्चिम विभागाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, सुर्यकुमार, कर्णधार पांचाळ, सर्फराज खान यांच्यावर राहिल. दक्षिण विभागाच्या मयांक अगरवालने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दोन सलग अर्धशतके नोंदवली असल्याने त्याची फलंदाजी बहरत असल्याचे दिसून येते. हा अंतिम सामना पाच दिवसांचा राहिल. दक्षिण विभागाचा कर्णधार हनुमा विहारीने 2022 साली बर्मिंगहॅम येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीतव केले होते तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपली शेवटची कसोटी चालू वर्षाच्या प्रारंभी लंकेविरुद्ध खेळली होती. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना वारंवार दुखापतीमुळे क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागल्याने त्यांची कसोटी क्रिकेटमधील प्रगती थांबली गेली आहे. या सामन्याला प्रत्येक दिवशी सकाळी 9.30 वाजता प्रारंभ होईल.









