पोलाईटस चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : सेंटपॉल्स स्कूल माजी विद्यार्थी संघटना पोलाईटस वर्ल्डवाईल्ड, सेंटपॉल्स स्कूल डॉ.मोदगी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पोलाईटस 14 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यातून सेंटपॉल्सने केएलई इंटरनॅशनल तर सेंट झेवियर्सने लव्हडेल संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून सेंट पॉल्सने जैन हेरिटेजचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला, दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या पासकलच्या पासवर आराध्य नाकाडीने गोल करून 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर जैन हेरिटेजने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात लव्हडेल संघाने इंडस अल्टम संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला साकीबच्या पासवर हुसेनने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. सातव्या मिनिटाला आयुष्यमानच्या पासवर हुसेनने दुसरा गोला करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला हुसेनच्या पासवर साकीबने तिसरा गोल केला. तर 35 व्या मिनिटाला अनिकेतच्या पासवर आयुष्यमानने चौथ्या गोल करून 4-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात इंडस अल्टॅम संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 2-0 असा पराभव केला.
सामन्याच्या 12 व्या मिनिटाला केएलईच्या रियान सय्यदच्या पासवर ललित हलभावीने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात खेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना ललितच्या पासवर रियान सय्यदने अप्रतिम गोल करून 2-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. चौथ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने ज्योती सेंट्रलचा 5-0 असा पराभव केला.सामन्याच्या आठव्या मिनिटाला अमानच्या पासवर महम्मद गौसने गोल करून 1-0 ची आघाडी मिळविली. 15 व्या मिनिटाला अबुझर तहसीलदारच्या पासवर अमान चौबेने दुसरा गोल केला. तर 20 व्या मिनिटाला आर्कान मतवालेच्या पासवर अबुझर तहसीलदारने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 37 व 40 व्या मिनिटाला आर्कान मतवालेने सलग दोन गोल करून संघाला 5-0 अशा मजबूत स्थितीत नेऊन ठेवले.
सोमवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंटपॉल्सने केएलई इंटरनॅशनल संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या आराध्य नाकाडीच्या पासवर करण डोंगरेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 16 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या नवीन पत्कीच्या पासवर आराध्य नाकाडीने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळविली. 32 व्या मिनिटाला केएलईच्या रियांश सय्यदच्या पासवर विशाल कांबळेने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 38 व्या मिनिटाला झेवियर्सच्या करण डोंगरेच्या पासवर नवीन पत्कीने तिसरा गोल करून 3-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने अटीतटीच्या लढतीत लव्हडेल सेंट्रल स्कूलचा 2-0 असा पराभव करीत अंतिमफेरीत प्रवेश केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 48 व्या मिनिटाला सेंट झेवियर्सच्या आर्कान मतवालेच्या पासवर महम्मद गौसने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास कांही सेकंद बाकी असताना झेवियर्सच्या अमान चोबेच्या पासवर महम्मद गौसने दुसरा गोल करून संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. लव्हडेल संघाने या सामन्यात अनेक आक्रमक चढाया केल्या. झेवियर्सच्या बचाव फळीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले.
मंगळवारी अंतिम सामना
सेंटपॉल्स विरुद्ध सेंट झेवियर्स यांच्यात सायंकाळी 4 वाजता खेळविण्यात येणार असून त्यानंतर बक्षिस वितरण होणार आहे.









