डॉ. सतीश जारकीहोळी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : भातकांडे स्पोर्ट्स अकादमी व जिल्हा वाल्मिकी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी कर्नाटक राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांतून आर्ष संघाने मोहन मोरे संघाचा 64 धावांनी तर के. आर. शेट्टी संघाने शाम युनायटेड कोप्पळचा 8 गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. गणेश कोप्पळ, गौस शेख, संतोष सुळगे पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात प्रथमेश मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात 7 गडी बाद 84 धावा केल्या. त्यात मारुती देसाईने 3 षटकार 2 चौकारासह 26, मंजू हुंबलने 2 षटकार 1 चौकारासह 18 तर देवराज कोटीने 2 षटकारासह 13 धावा केल्या. शाम युनायटेड कोप्पळतर्फे गणेश कोप्पळ, प्रणेश व लक्ष्मण कोप्पळ यांनी प्रत्येकी 2 तर सद्दामने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शाम युनायटेड कोप्पळने 6 षटकात 3 गडी बाद करुन 87 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात गणेश कोप्पळने 2 षटकार 4 चौकारासह 17 चेंडूत 37, रमेश गंगावतीने 2 षटकार 2 चौकारासह 22, नफीस गंगावतीने 2 षटकार 1 चौकारासह 20 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे उमेश गावणेरने 31 धावांत 2 तर पवन तलवारने 1 गडी बाद केला.
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर्ष संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 116 धावांचा डोंगर उभा केला. त्यात गौस शेख व वाहीद अब्दुल यांनी प्रत्येकी 37 तर अनूप मजलीकरने 12 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे संतोषने 27-3, मुत्तू नायक व महांतेश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 8 षटकात 8 गडी बाद 52 धावा केल्या. त्यात मुत्तू नायकने 2 चौकारासह 15, रघु सोमशेखरने 2 चौकारासह 12 धावा केल्या. आर्षतर्फे कृष्णा चंदीकरने 7 धावांत 3, कुलदीप नाईक व इम्रान यांनी प्रत्येकी 2 तर डॉमनिक फर्नांडीसने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शाम युनायटेड कोप्पळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 78 धावा केल्या. रवी गंगावतीने 3 षटकार 1 चौकारासह 30, शिवनगौडाने 2 षटकारासह 14 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे संतोष सुळगे पाटीलने 10 धावांत 4, श्रेयस मात्तीवड्डरने 23 धावांत 2 तर किरण तरळेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टीने 6.4 षटकात 2 गडी बाद 79 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात संतोष सुळगे पाटीलने 5 उत्तुंग षटकार व 4 चौकारासह 23 चेंडूत 56, नरेंद्र मांगोरेने 3 चौकारासह 20 धावा केल्या. कोप्पळतर्फे सद्दाम व धनुष्य यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे दिनेश बोगडे, बसवराज दोडमनी, शंकर नाईक, राजशेखर तलवार, सागर राजाई, विजय तलवार, रुपेश पावले, प्रणय शेट्टी, मिलिंद भातकांडे आदी मान्यवरांच्या हस्ते संतोष सुळगे पाटील, गौस शेख, गणेश कोप्पळ यांना सामनावीर तर रवी गंगावती, वाहीद अब्दुल, मारुती देसाई यांना चषक देवून इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
कोण होणार डॉ. सतीश जारकीहोळी चषकाचा मानकरी
अंतिम सामना शुक्रवारी सकाळी 10 वाजता खेळविण्यात येणार असून के. आर. शेट्टी संघात रब्बानी दफेदार, नरेंद्र मांगोरे, अभिषेक देसाई, आकाश कटांबले, किरण तारळेकर, रोहीत पाटील, संतोष सुळगे पाटील, शफीक, श्ा़dरेयश मात्तीवड्डर तर आर्षमध्ये गौस शेख, अनुप, वाहीद अब्दुल, कृष्णा चांदेकर, कुलदीप नाईक, इम्रान आणि डॉमनिक फर्नांडीस या सारखे अष्टपैलु खेळाडू असल्याने हा अंतिम सामना रंगतदार होणार, अशी क्रिकेट शौकिनांतून चर्चा सुरू आहे.









