आमिर खानने स्वत:चा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ची घोषणा केली आहे. या मोठ्या घोषणेसोबत त्याने हा चित्रपट लोकांमधील उणीवांसोबत त्या मान्य करण्याच्या संकल्पनेवर आधारित असल्याचे सांगितले आहे. लवकरच या चित्रपटासाठी काम सुरू करणार आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित तारे जमीन पर चा सीक्वेल असणार आहे. पहिल्या चित्रपटात एका मुलाला मदत केली होती, तर आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’मध्ये 9 तरुणांना मदत करताना दिसून येणार असल्याचे आमिरने सांगितले आहे.
हा चित्रपट मुलांना त्यांच्यातील उणीवांसोबत स्वीकारण्याच्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाबद्दल आताच फारसे काही सांगू शकत नाही. परंतु याचे नाव जाहीर करू शकतो. सितारे जमीन पर असे याचे नाव असणार आहे. तारे जमीन पर या चित्रपटाच्या थीमसोबत आम्ही वाटचाल करणार आहोत. तारे जमीन पर ही एक भावुक थीम होती, परंतु नवा चित्रपट तुमचे मनोरंजन करणार आहे. मागील चित्रपटात ईशान या मुलाला मदत केली होती, आता 9 मुले माझ्या व्यक्तिरेखेला मदत करताना दिसून येतील असे आमिरकडून सांगण्यात आले.
आमिरने 2022 मध्ये लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप ठरल्यावर अभिनयाच्या क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. परंतु तो चित्रपटनिर्मितीत सक्रीय आहे. आमिर आता सितारे जमीन पर या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्न करू शकतात. आमिरने 3 ऑक्टोबर रोजी ‘लाहौर 1947’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत. या चित्रपटात सनी देओल देखील झळकणार आहे.









