भारतीय रसिकांचा हिरमोड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा ध्वज फडकवण्यात यश मिळालेले नाही. हिंदी भाषेतील चित्रपट ‘अनुजा’ ऑस्कर जिंकू शकला नाही. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट श्रेणीत नामांकन मिळाले. मात्र, या श्रेणीत ‘आय एम नॉट अ रोबोट’ या डच चित्रपटाने ऑस्कर जिंकला आहे.
‘अनुजा’ हा चित्रपट अॅडम जे ग्रेव्हज यांनी बनवला आहे. प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘अनुजा’ या चित्रपटात सजदा पठाण, अनन्या शानबाग आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या लघुपटाचा प्रीमियर ऑगस्ट 2024 मध्ये हॉलीशॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. ‘अनुजा’ची कथा नऊ वर्षांच्या मुलीची असून या चित्रपटाची निर्मिती सलाम बालक ट्रस्टने (एसबीटी) संयुक्तपणे केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. 2025 च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘अनुजा’ या लघुपटाला भारतातून लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले होते. तथापि, सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार डच चित्रपट निर्मात्या व्हिक्टोरिया वॉर्मरडॅम आणि निर्माते ट्रेंट यांच्या ‘आय एम नॉट अ रोबोट’ या चित्रपटाने जिंकला. ‘अनुजा’ला ऑस्कर न मिळाल्याने देशातील चित्रपट शौकिनांच्या स्वप्नांचा हिरमोड झाला. ऑस्करमध्ये ‘अ लाईन’, ‘आय अॅम नॉट अ रोबोट’, ‘द लास्ट रेंजर’ आणि ‘द मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेंट’ या चित्रपटांसह ‘अनुजा’चा समावेश होता.









