डिचोली पालिका मंडळाच्या बैठकीत शिकामोर्तब : मागील पालिका बैठकीत ठराव घेऊनही कार्यवाही न झाल्याने नाराजी
प्रतिनिधी / डिचोली
शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या इमारतीची फाईल मागील बैठकीतील ठरावानुसार दक्षता खात्याकडे चौकशीसाठी पाठविण्यात यावी, यावर बुधवारी झालेल्या डिचोली पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब झाले. मागील बैठकीत ठराव घेऊनही त्यावर कार्यवाही न झाल्याने बैठकीत नगरसेवकांनी गोंधळ घातला. अखेर सदर फाईल दक्षता खात्याकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले. “त्या” इमारतीचा निवासी दाखला नगरपालिकेने मागील बैठकीनंतर लगेच मागे घेतला होता.
या बैठकीस नगराध्यक्ष कुंदन फळारी, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, उपनगराध्यक्षा सुखदा तेली, नगरसेवक सुदन गोवेकर, अनिकेत चणेकर, सतीश गावकर, विजयकुमार नाटेकर, निलेश टोपले, दीपा शिरगावकर, दीपा पळ, गुंजन कोरगावकर, ऍड. रंजना वायंगणकर, ऍड. अपर्णा फोगेरी, तनुजा गावकर, रियाझ बेग, मुख्याधिकारी रोहन कासकर, कनिष्ठ अभियंता नदीम शेख आदींची उपस्थिती होती.
डिचोली शहरात उभारण्यात आलेल्या ‘त्या’ वादग्रस्त इमरतीचा विषय गेल्या बैठकीत गाजला होता. कोणत्याही नियमांचे पालन न करता इमरतीचे बांधकाम झाले आहे. तसेच इमारतीच्या काम पूर्ण होण्यापूर्वीच निवासी दाखलाही देण्यात आल्याचे निदर्शनास येताच सर्व नगरसेवकांनी आश्चर्य व नारजी व्यक्त केली होती. त्यावेळी सदर इमरतीचा निवासी दाखला रद्द करून फाईल दक्षता खात्याकडे पाठविण्याचा, तसेच निवासी दाखल्यचे ‘पोस्ट अकुपन्सी ऑडिट’ करण्याचा ठराव घेण्यात आला होता.
त्या ठरावानुसार नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता व तांत्रिक विभागाच्या अधिकाऱयांनी इमारतीची पाहणी केली होती. तर दुसऱया बाजूने मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी या इमारतीला देण्यात आलेला निवासी दाखला स्थगित करण्यात आला होता. विशेष म्हणजे सदर काम पूर्ण होण्यापूर्वीच देण्यात आलेली निवासी दाखल्यावर मुख्याधिकारी व पालिका अभियंत्यांच्या सह्या असल्याचे मागील पालिका बैठकीतच उघडकीस आले होते. आणि काल बुध. दि. 16 रोजी झालेल्या बैठकीत नेमके मुख्याधिकारी पालिका अभियंता रजेवर गेल्याने ते अनुपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत वातावरण संतप्त बनले होते. ते नसताना बैठक घेण्यापेक्षा बैठकच रद्द करूया, आणि हे दोन्ही अधिकारी आल्यानंतर बैठक घेऊया, असा पवित्रा काही नगरसेवकांनी घेतला.
कामचुकारपणा नको : आमदार शेटये
अखेर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े हे बैठकीस दखल झाल्यानंतर त्यांनी अधिकारी वर्गाला सज्जड इशारा देत कोणत्याही कामात कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. तसेच तत्काळ सदर इमारतीची फाईल दक्षता खात्याकडे पाठविण्यात यावी, अशी सूचनाच दिली. त्यानंतर सर्वांच्या मान्यतेनुसार या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच निवासी दाखला स्थगितीचा आदेश जारी करूनही या इमारतीत काम सुरूच आहे. तसेच सदर भाडय़ाने दुकाने घेतलेल्या दुकानदारांनी आपले जाहिरात फलकही लावले आहेत. ते तत्काळ हटविण्यात यावे, असाही ठरावही यावेळी घेण्यात आला.
या इमारतीबरोबरच प्रभाग क्र 1 मध्ये तिळारी कालव्याला लागूनच एका इमारतीचे काम अशाच प्रकारे बेकायदेशीर सुरू असल्याची गोष्ट काही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली. कालव्याच्या कमांड क्षेत्राचे उल्लंघन या इमारत बांधकाम करणाऱयाने केले आहे. त्याचीही रितसर चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली.
डिचोली बाजारातील पत्र्यांचे 24 गाळे लवकर हटविण्यात यावे असा ठराव मागील बैठकीत घेण्यात आला होता. परंतु त्याचीही कार्यवाही न झाल्याने पालिका बैठकीत नाराजीचा सूर उमटला. तर हे गाळे त्वरित हटवावे, अशी मागणी यावेळी केली. हे गाळे हटविण्याची प्रक्रिया का हाती घेतली नाही? असा सवाल यावेळी नगराध्यक्षांना विचारला. तर यासाठीची संपूर्ण प्रक्रिया झाली असून मुख्याधिकाऱयांनी त्यावर स्वाक्षरी न केल्याने ती प्रलंबित राहिली आहे, असे उत्तर दिले.
या विषयांबरोबरच अनेक विषय बैठकीत चर्चेला आले. डिचोली शहरात वाढलेल्या बेवारस कुत्र्यांची समस्या मोठी डोकेदुखी ठरत असल्याने त्यावर उपाययोजना लवकर हाती घेण्यात यावी. पालिकेने घेतलेल्या दहा कामगारांचाही विषय या बैठकीत आला.









