हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन : शेकडोंच्या संख्येने मराठी भाषिकांची उपस्थिती : महाराष्ट्राकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी भाषिकांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्र सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
कर्नाटक हे बहुभाषिक राज्य
मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सीमासमन्वय मंत्र्यांबाबत उघड शब्दात नाराजी बोलून दाखविली. समन्वय मंत्री नेमण्यात आले परंतु त्यांनी एकदाही बेळगावमधील मराठी माणसांची भेट घेतलेली नाही. त्यामुळे येथील समस्या त्यांना कशी समजणार? कर्नाटक 1956 पासून बहुभाषिक राज्य आहे. याठिकाणी अनेक भाषांचे लोक एकत्रित राहतात. त्यामुळे कोणत्याही भाषेची सक्ती करता येणार नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले.
महाराष्ट्रात जोवर मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्रिपदी आर. आर. पाटील होते, तोवर सीमाप्रश्नाच्या खटल्याला गती मिळत होती. परंतु त्यानंतरच्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी पाठपुरावाच केला नसल्याचे सिद्ध होते. महाराष्ट्रातील नेते म. ए. समितीतील दुहीबद्दल सल्ला देत असतात. परंतु कोणत्या संघटनेत अथवा पक्षात मतभेद नाहीत? आमच्यात मतभेद असले तरी सीमाप्रश्नाची सोडवणूक हे एकच ध्येय सर्वांसमोर असल्याचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले.
यापुढील काळात रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार रहा
राष्ट्रीय पक्षाच्या नादाला लागून काही मराठी भाषिक षंढ झाले आहेत. ज्या ज्यावेळी इतर भाषिकांवर अन्याय होतो, तेव्हा त्यांच्यात पक्षीय भेद बाजूला ठेवून एकी होते. परंतु बेळगावमधील मराठी भाषिक मात्र एकत्र येत नसल्यामुळेच मराठी भाषेचे सर्वाधिक नुकसान होत आहे. एकीकडे कर्नाटक सरकार आक्रमकपणे कन्नडसक्ती राबवित असताना दुसरीकडे मराठी भाषिक मूग गिळून गप्प असल्याबद्दल युवा नेते शुभम शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी यापुढील काळात रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार रहा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, खानापूर म. ए. समितीचे गोपाळ देसाई, बाळाराम पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव अॅड. एम. जी. पाटील यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकुर, रमाकांत कोंडुसकर, नगरसेवक रवी साळुंखे, प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, दत्ता जाधव, बी. ए. येतोजी, रणजित हावळाण्णाचे, एम. वाय. घाडी, दिगंबर पाटील, मारुती परमेकर, जयराम देसाई, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, मदन बामणे यांच्यासह इतर उपस्थित होते.









