कोळवीतील खुनाचा एका दिवसात छडा : दोन अल्पवयीनांसह आठ जणांना अटक
बेळगाव : कोळवी, ता. गोकाकजवळ मकर संक्रांतीदिवशी मध्यरात्री मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह गोकाक ग्रामीण पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. एक महिन्यापूर्वी कोळवी येथील गुळीबसवेश्वर जत्रेत क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. एस., अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामगोंड बसर्गी, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश बाबू व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून खुनासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकल, पाच मोबाईल, तलवार, जांबिया जप्त करण्यात आले आहेत. विजयकुमार ऊर्फ कुमार मल्लाप्पा नाईक, रा. कोळवी, मनोज आप्पण्णा पात्रोट, मूळचा रा. कोळवी, सध्या रा. बेळवडी, अभिलाष बसवराज पात्रोट, रा. कोळवी, मारुती यल्लाप्पा वड्डर, रा. बेळवडी, उमेश बाळाप्पा कंबार, रा. कोळवी, रवीचंद्र सुभाष पात्रोट, रा. कोळवी अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे असून दोघा अल्पवयीनांनाही अटक झाली आहे.
बुधवार दि. 15 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास कोळवीजवळ प्रकाश मारुती हिरट्टी (वय 26) रा. कोळवी याचा धारदार शस्त्राने वार करून भीषण खून करण्यात आला होता. प्रकाशची पत्नी आरती हिरट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी खुनानंतर केवळ एका दिवसात संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. डिसेंबर 2024 मध्ये कोळवी येथील गुळीबसवेश्वर जत्रेत खून झालेला प्रकाश हिरट्टी व प्रमुख आरोपी विजयकुमार ऊर्फ कुमार नाईक या दोघा जणांमध्ये भांडण झाले होते. गावच्या प्रमुखांनी भांडणतंटे करू नकोस, अशी विजयकुमारला ताकीद केली होती. त्यामुळे विजयकुमारने प्रकाशवर वैर ठेवले होते. संधी मिळेल तेव्हा त्याचा काटा काढण्याचे त्याने ठरविले होते. आपल्या मित्रांसमोरही ही गोष्ट बोलून दाखवली होती.
मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी 10.30 वाजण्याच्या सुमारास प्रकाश हिरट्टी हा हुलीकट्टी येथील शिवलिंगेश्वर जत्रेत असल्याचे विजयकुमारने पाहिले. त्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह आठ जणांना एकत्र करून खुनाचा कट रचण्यात आला. हुलीकट्टी तलावाजवळ हे सर्वजण दबा धरून बसले होते. जत्रेहून मोटारसायकलवरून परतणाऱ्या प्रकाशवर पाळत ठेवण्यात आली होती. दोन अल्पवयीन मुलांना याकामी जुंपण्यात आले होते. प्रकाश जत्रेतून मोटारसायकलवरून बाहेर पडल्याचे समजताच हुलीकट्टीहून कोळवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रतीक्षा करण्यात येत होती. मोटारसायकल अडवून प्रकाशवर तलवार, जांबियाने वार करून त्याचा खून करण्यात आला होता.
प्रकाश हिरट्टी याच्या मोटारसायकलवर आणखी दोघेजण होते. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास कोळवीजवळ मोटारसायकल अडविण्यात आली. प्रकाश पाठीमागे बसला होता. मोटारसायकल थांबताच त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. पळून जाण्याच्या घाईत प्रकाश रस्त्याशेजारील खड्ड्यात पडला. आरोपींनी त्याच्यावर चाकू, जांबिया व तलवारीने वार करून त्याचा खून केला. खुनाच्या घटनेनंतर एका दिवसात त्याचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.









