भाविकांची होणार अलोट गर्दी
ओटवणे | प्रतिनिधी
कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री देव कलेश्वरला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार व आकर्षक फुलांनी सजविण्यात आले असुन मंदिर परिसरात आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कलेश्वरच्या दर्शनासह केळी – नारळ ठेवणे, नवस बोलणे – नवस फेडणे या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री १२ वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १ वाजता आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्रीदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी हरी राऊळ आणि श्री देव कलेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजन राऊळ यांनी केले आहे.









