प्रतिनिधी/ सातारा
इंग्रजी नववर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण मोठय़ा उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. दरवर्षी पौष महिन्यातील मकर संक्रांतीला महिला वर्ग मोठय़ा उत्साहाने साजरा करतो, मात्र गेली दोन वर्षे करोना महामारीच्या मुळे या सणाला थोडे ओदासिन्य प्राप्त झाले होते.
मात्र यावर्षी रविवारी पौष अष्टमीच्या मुहूर्तावर संक्रांतीचा हा सण वाणवसा घेणे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन रुक्मिणी देवीपुढे लुटावयाचे जिन्नस ठेवून तसेच ओटी भरून पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. मंदिरामध्ये आलेल्या सुवासिनींनी एकमेकीला हळदी-कुंकू लावून तिळगुळ आणि काटेरी हलवा देत तसेच घरोघरी लुटावयाला आणलेले जिन्नस एकमेकीला देत हे सौभाग्याचे वायन अर्थात वाण दिले. या सणाचे दिवशी विडय़ांच्या पानाची देवघेव करण्याची प्रथा पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात जोपासली जाते.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील घाटगे विठ्ठल मंदिर, मंगळवार पेठ येथील श्री गवई विठ्ठल मंदिर, शनिवार पेठेतील शहाराम मंदिर तसेच विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या सणासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांति दिवशी पर्वकाळ असल्यामुळे महिलांचा उत्साह अधिकच होता. संक्रांतिपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते.
पुजेसाठी झाली मोठी गर्दी
अनेक महिलांनी संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचा समारंभ घरी ठेवून एकमेकीला वाणवसाचे पदार्थ लुटले. तसेच तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत हा सण साजरा केला. नवविवाहित महिला तसेच छोटय़ा बालकांना काळ्या रंगाचे कपडे तसेच काटेरी हलव्याचे दागिने परिधान करून हा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा जिह्यातील फलटण येथील श्रीराम मंदिर, फलटण तालुक्यातील सीताबाईचा डोंगर, चाफळ येथील श्रीराम देवस्थान येथे महिलांनी वाणवसा करण्यासाठी तसेच पुजेसाठी मोठी गर्दी केली होती.








