संपूर्ण शहर पहाटेपासूनच प्रकाशमान, सर्वत्र लक्ष्मीपूजनाची लगबग: बाजारपेठेत गर्दी
बेळगाव
सौख्य जणू भरून हे आले ओंजळी,
आली दिवाळी, आली दिवाळी
अशा भावनेने शहरवासियांनी उत्सवाच्या सम्राज्ञीचे म्हणजेच दिवाळीचे स्वागत केले. दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण शहर उत्साहाने सळसळत आहे. घरोघरी लावलेले आकाश कंदील, त्यातून पाझरणारा प्रकाश आणि शहरात सर्वत्र करण्यात आलेली विद्युतरोषणाई यामुळे हा उत्सव खऱ्याअर्थाने दीपांचा उत्सव आहे, याची प्रचिती येत आहे. सोमवारी पहाटे महिलांनी घराच्या प्रवेशद्वारासमोर विविधरंगी आणि कलात्मक अशा रांगोळ्या रेखाटल्या. काही ठिकाणी फुलांची रांगोळी रेखाटण्यात आली. रांगोळ्यांवर विविध रंगांचे दिवे लावण्यात आल्याने परिसर पहाटेच्यावेळी उजळून गेला. एका अर्थाने तमातून तेजाकडे जाण्याचा हा उत्सव असल्याने संपूर्ण शहर पहाटेपासूनच प्रकाशमान झाले होते. दिवाळीचा हा दिवस अश्विन कृष्ण चतुर्दशीचा दिवस. याच दिवशी नरकासुराचा भगवान श्रीकृष्णांनी वध केला व त्याच्या त्रासातून जनतेला मुक्त केले. तेव्हापासून हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून ओळखला जात आहे. नरकासुराचेच प्रतीक म्हणून कारिट फोडण्याचीही प्रथा आहे. पहाटे पहाटे सुगंधी तेलासह उटणे लावून अभ्यंगस्नान झाले. त्यानंतर घरातील ज्येष्ठ महिलांनी आपल्या कुटुंबीयांचे औक्षण केले. त्यानंतर बऱ्याच कुटुंबातील मंडळींनी देवदर्शन घेऊन मगच फराळाचा आस्वाद घेतला.
लक्ष्मीपूजनाची लगबग
सोमवारी दुपारी 3 वाजून 44 मिनिटाला अमावास्या सुरू झाल्याने काही जणांनी सोमवारीच लक्ष्मीपूजन केले. मंगळवारी सायंकाळी 5.54 पर्यंत अमावास्या आहे. लक्ष्मीपूजन अमावास्येच्या काळातच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे अनेकांनी सोमवारीच लक्ष्मीपूजन उरकून घेतले. अर्थातच सायंकाळनंतर दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनाची लगबग उडालेली दिसली. या दीपोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत मात्र सदैव गर्दी दिसून आली. दुकानांमध्ये मोठ्या शोरुम्समध्ये, सराफी पेढ्यांमध्ये गर्दी झालीच होती. परंतु, तितकीच गर्दी रस्त्यावरील विक्रेत्यांकडे खरेदी करतानाही दिसून आली.
प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, पणत्या, रांगोळीचे छाप, रांगोळीचे स्टीकर्स, रांगोळीचे पेन याबरोबरच तोरण आदी साहित्य घेऊन ठिकठिकाणी विक्रेते बसले होते. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे ग्राहकांचा ओघही चांगला होता. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठेमध्ये खातेकीर्द वही, बत्तासे, चुरमुरे, पेढे, हार-तुरे, श्रीफळ, विड्याची पाने यासह पूजा साहित्याची आवकही वाढली होती. फूलबाजाराने तर चांगलेच मार्केट खेचले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ऊस आणि झेंडूच्या फुलांचीही चांगली विक्री झाली. बुधवारी बलिप्रतिपदा असून यादिवशी लक्ष्मीकुबेर पूजन करण्यात येते. काही मंडळी या दिवशीसुद्धा कुबेर पूजन करून नवीन आर्थिक व्यवहाराला प्रारंभ करतात.
उपनगरातही गर्दी
मध्यवर्ती बाजारपेठेबरोबरच अलीकडच्या काळात शहापूर, टिळकवाडी, अनगोळ याबरोबरच उपनगरांमध्येही गर्दी दिसून येत आहे. बेळगावला ग्रामीण भागातील लोक प्रामुख्याने येत असल्याने गर्दी वाढत राहते. वाहतूक कोंडीही होते. ते टाळण्यासाठी उपनगरांमध्येसुद्धा खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. एकूणच प्रकाशाच्या या उत्सवाला उत्साही वातावरणात प्रारंभ झाला असून पुढचे काही दिवस ही धूम कायम राहणार आहे.









