पर्यावरण प्रेमींचा प्रतिसाद , 22 हजार रोपांची विक्री, आज सांगता
प्रतिनिधी/ बेळगाव
बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरविण्यात आलेल्या बागायत महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केवळ दोन दिवसात तब्बल 22 हजार फळ, पुष्प रोपांची विक्री झाली आहे. त्यामुळे बागायत खात्याचा महोत्सव यशस्वी झाला आहे. विशेषत: विविध जातींच्या फळ-फुलांच्या रोपांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींची पावले वळू लागली आहेत.
बागायत खात्यामार्फत दरवर्षी रोप बाजाराचे आयोजन केले जाते. यंदा देखील वनस्पती महोत्सवाअंतर्गत विविध जातींच्या रोपांचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. विशेषत: आंबा, चिकू, फणस, सीताफळ, काजू, पेरु, डाळिंब, लिंबू, नारळ यासह गुलाब, पाम, जास्वंदी, मोगरा यासह शोभिवंत रोपट्यांची सवलतींच्या दरात विक्री होऊ लागली आहे. गतवर्षी भरविण्यात आलेल्या रोप बाजारात तब्बल 90 हजार रोपांची विक्री झाली होती. यंदादेखील या महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे.
या महोत्सवात विविध रोपांच्या विक्रीबरोबर पामतेल झाडे, सेंद्रिय शेती, गांडूळ खत, मध आणि आळंबी उत्पादनाबाबत विशेष माहिती दिली जाते. एकाच छताखाली विविध प्रकारची रोपे आणि बागायत शेतीबाबत माहिती मिळत असल्याने पर्यावरण प्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. नैसर्गिक मध आणि आळंबी उत्पादन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
आज सांगता
क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये बागायत खात्यामार्फत भरविण्यात आलेल्या बागायत महोत्सवाची आज सांगता होणार आहे. शुक्रवारी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. विविध जातींच्या रोपाबरोबर नैसर्गिक शेतीबाबतही माहिती दिली जात आहे.
महांतेश मुरगोड (बागायत खाते सहसंचालक)
बागायत महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला आहे. 22हजारहून अधिक रोपांची विक्री झाली आहे. आज शेवटचा दिवस आहे. नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, सेंद्रिय शेती, आळंबी आणि मध उत्पादनाबाबतही माहिती दिली जात आहे.









