जागतिक व्याघ्र दिन विशेष : खानापुरात नैसर्गिक अधिवास वाढला : 8 वाघांचे अस्तित्व
बेळगाव : वाघांचे संवर्धन आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे जतन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: बेळगाव विभागातील खानापूर वनक्षेत्रात 8 पट्टेरी वाघांची गगनभेदी डरकाळी घुमू लागल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बेळगाव, खानापूर वनक्षेत्रासाठी ही दिलासादायक बाब आहे. अलीकडे वनक्षेत्रात वाढ होत असल्याने साहजिकच वाघांची संख्याही टिकून आहे. आज जागतिक व्याघ्र दिन यानिमित्ताने वनखाते आणि वन्य अभ्यासकांशी संवाद साधून घेतलेला वाघांचा आढावा…
► बेळगाव विभागातील खानापूर वनक्षेत्रात वाघांची संख्या किती आहे?
खानापूर वनक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वन्यजीवांची संख्याही वाढू लागली आहे. एकूण 11 पट्टेरी वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यापैकी 3 वाघ गोवा आणि महाराष्ट्र राज्यात ये-जा करीत असतात. त्यामुळे 8 वाघांची नोंद आहे.
► अलीकडे वाघांची संख्या वाढली आहे का?
नक्कीच वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मानव आणि वाघ यांच्यातील विकोपाला गेलेला संघर्ष नियंत्रित करण्याची गरज आहे. आणि त्यादृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
► खानापूर विभागात वाघांचे अस्तित्व कोठे आहे?
खानापूर वनक्षेत्रात भीमगड, लोंढा, कणकुंबी, नागरगाळी आणि गोल्याळी परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: वाघांच्या संख्येत कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वाघांची नोंद किंवा गणती कशी होते?
अलीकडे वाघांची गणती किंवा नोंद करणे सोपे झाले आहे. कॅमेरे, सेन्सर ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरे, पायांचे ठसे व विष्टेवरून नोंदी घेतल्या जातात. दर चार वर्षांतून एकदा व्याघ्र गणना केली जाते. दोन वर्षांपूर्वी खानापूर वनप्रदेशात वाघांची गणती झाली आहे.
► वाघांच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
वाघांचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकार अधिक प्रयत्नशील आहे. त्याला वनखात्याचे सहकार्य मिळत आहे. शरीरावरील पट्ट्यांवरून त्यांची ओळख निर्माण करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.
► खानापूर वनक्षेत्रात वाघासह इतर वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे का?
खानापूर वनक्षेत्र वन्यजीवांसाठी पूरक आहे. त्यामुळे याठिकाणी वाघांसह गवीरेडे, अस्वल, बिबटे, साळींद्र, कोल्हे, हरीण, सांबर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे.
► वाघ परराज्यात स्थलांतर करतात का?
सहसा वाघ हा प्राणी आपल्या एका परिघामध्ये वास्तव करतो. आपल्या सुरक्षिततेसाठी आणि नैसर्गिक आदिवासासाठी संचार करीत असतो. त्यांना राज्याच्या सीमा माहित नसतात.
भुतरामट्टी प्राणी संग्रहालयातील बंदिस्त वाघांविषयी काय सांगाल?
भुतरामट्टी प्राणी संग्रहालयात असणाऱ्या वाघांमुळे लोकशिक्षण, वन्यजीव शिक्षण आणि जागृती होत आहे. मात्र, पिंजऱ्यातील बंदिस्त वाघ आणि घनदाट जंगल क्षेत्रातील वाघ यामध्ये बराच फरक आहे.
► वाघांची संख्या टिकून राहण्यासाठी वनखाते काय करते?
वाघांची संख्या टिकून रहावी किंवा वाढावी यासाठी गवताळयुक्त माळरान सुरक्षित ठेवले जात आहे. त्याबरोबर दरवर्षी नवीन रोपांची लागवड करून वनक्षेत्र वाढविले जाते. शिवाय वाघांची उपजिविका करणाऱ्या तृणभक्षी जंगली प्राण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.









