मोदेकोपजवळ आठ दिवसांपूर्वी जप्त केलेला दारूसाठा अधिकाऱ्यांकडूनच हडप
बेळगाव : खानापूर तालुक्यातील मोदेकोप क्रॉसजवळ आठ दिवसांपूर्वी अबकारी अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. या साठ्यातील सुमारे 301 बॉक्स दारूसाठा अधिकाऱ्यांनीच हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी अबकारी निरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. मंगळवार दि. 7 मार्च रोजी दुपारी जांबोटी-खानापूर रोडवरील मोदेकोप क्रॉसजवळ जीजे 10, टीटी 8276 क्रमांकाचा बाराचाकी कंटेनर अडवून तपासणी करण्यात आली असता या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली होती. वाहनचालक चंद्रकांत गजेंद्र शेरे (वय 27) रा. उडेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव (उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. या वाहनातून 452 बॉक्स इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या वाहनात 753 बॉक्स इतका दारूसाठा होता. यापैकी 301 बॉक्स अधिकाऱ्यांनी परस्पर हडपल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मात्र, जप्त दारूसाठा अधिकाऱ्यांनीच हडप करून खानापूर विभागीय कार्यालयात 202 बॉक्स व सुरल येथे 99 बॉक्स काढून ठेवण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा साठा ताब्यात घेतला आहे. यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खानापूर विभागाचे अबकारी निरीक्षक दावलसाब शिंदोगी, कणकुंबी तपास नाक्याचे अबकारी निरीक्षक सदाशिव कोरती, कणकुंबी तपास नाक्याच्या अबकारी उपनिरीक्षक पुष्पा गडादी यांच्यासह आणखी एक अधिकारी असे एकूण चार अधिकारी व एक कर्मचारी अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अबकारी उपायुक्त एम. वनजाक्षी यांनी ही कारवाई केली आहे. सुरुवातीला वाहनासह 67 लाख 73 हजार 120 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली होती. आता पुन्हा 301 बॉक्स दारूसाठा जप्त केल्यामुळे याची एकूण किंमत 99 लाख 72 हजार 680 रुपये इतकी होते.









