खानापूर पोलीस शोधासाठी बिडला रवाना
खानापूर : मुलीने विरोधाला डावलून प्रेमविवाह केल्याच्या रागातून पित्यानेच अन्य तीन नातेवाईकांच्या मदतीने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार जावयाने खानापूर पोलिसात दिली आहे. सदर घटना बरगाव क्रॉस येथे गुरुवारी घडली असून खानापूर पोलिसांचे पथक तपासासाठी बिडला रवाना झाले आहे. याबाबत माहिती अशी की, बिड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील वैष्णवी अरुण गोवेकर सध्या रा. बरगाव क्रॉस खानापूर ता. हिने अरुण गोपाळ गेवेकर याच्याशी प्रेमविवाह केला होता. वैष्णवीचे वडील नवनाथ तुळसीराम शिणगरे यांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बर्दापूर पोलीस ठाण्यात दिली होती. वैष्णवी आणि अरुण यांनी रितसर प्रेमविवाह केल्यानंतर पुणे येथील चिखले पोलिसात हजर होऊन आपण लग्न केल्याचे सांगून कागदोपत्री पुरावा दिला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते. यानंतर अरुण आणि वैष्णवी हे बर्दापूर येथे रहात होते. मात्र वैष्णवीचे वडील नवनाथ शिणगारे हे वारंवार घरी येऊन त्यांना त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून अरुण गोवेकर यांनी खानापूर तालुक्यातील बरगाव येथे येऊन आपला संसार थाटला होता.
कारगाडीतून अपहरण
याची माहिती वैष्णवीचे वडील तुळसीराम शिणगारे यांना लागली होती. त्यांनी गुरुवारी दुपारी बरगाव येथे वैष्णवी आणि अरुण रहात असलेल्या ठिकाणी येऊन नवनाथ शिणगारे, अरविंद शिणगारे, किशोर पवार, योगेश जिरे यांनी वैष्णवी हिला कारगाडीत कोंबून अपहरण केले असल्याची फिर्याद अरुण गोवेकर यांनी खानापूर पोलिसात दिली आहे. या फिर्यादीची गांभीर्याने दखल घेत खानापूर पोलिसांचे पथक पुढील तपासासाठी बिडला रवाना झाले आहे. बिड येथे वैष्णवी आणि अरुण याच्या घरी जावून माहिती घेतली असता या ठिकाणी ती नसल्याने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.









