मूषक, अर्थात उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. हिंदू धर्मात या मूषकालाही अशा प्रकारे मानाचे स्थान देण्यात आले आहे. अनेक मंदिरांमध्ये उंदरांना मारण्यावर पूर्ण निर्बंध असून भारतातील एका प्रसिद्ध मंदिरात तर 20 हजारांहून अधिक मूषक वास्तव्यात असतात, असे सांगितले जाते. तथापि, आपल्याकडे सहसा घरात कोणी उंदीर पाळत नाहीत. तो दिसला की त्याला हुसकण्याकडे किंवा मारण्याकडे आपला कल असतो. काहीना मात्र, उंदराचे विलक्षण प्रेम असते.
ब्रिटनमध्ये बर्मिंगहॅम येथे राहणाऱ्या लीसा मुर्रे-लँग नामक 47 वर्षांच्या महिलेने असाच एक उंदीर पाळला होता. त्या त्याचे अतिशय लाड करीत असत. आपले स्वत:चे अपत्य असावे अशा प्रकारे त्या त्याला सांभाळत असत. सीरीयन हॅम्स्टर प्राजातीच्या या उंदराचे नाव त्यांनी स्पड असे ठेवले होते. हा भटक्या प्रकारातील उंदीर असून तो एका जागी फारकाळ थांबत नाही. तसेच त्याचा फिरण्याचा आवाकाही प्रचंड असतो. एक-दोन किलोमीटरच्या परिसरातही तो फिरतो.
लीसा यांच्या उंदरालाही अशीच फिरण्याची सवय होती. त्यामुळे त्याला फिरवून आणणे, हा त्यांचा आवडता उद्योग होता. उंदराचे आयुष्य माणसाच्या तुलनेत अतिशय कमी असते. त्यामुळे कालांतराने स्पडचा मृत्यू झाला. तथापि, तो लीसा यांच्या स्मृतीत सतत जिवंत राहिला. त्याची आठवण संपू नये म्हणून त्याच्या काही अस्थी त्यांनी आपल्या जवळ ठेवून घेतल्या. त्याची फिरण्याची आवड लक्षात घेऊन आता लीसा या आपल्या पतीसह युरोप खंडाच्या दौऱ्यावर निघाल्या आहेत. प्रवासाला जाताना त्यांनी अर्थातच आपल्या लाडक्या मूषकाच्या अस्थी स्वत:सह घेतल्या आहेत. त्याची फिरण्याची आवड त्या त्याच्या मृत्यूनंतरही पूर्ण करीत आहेत. आपल्या आवडत्या उंदराला अशा प्रकारे आपण जणू काही श्रद्धांजली देत आहोत, अशी आपली भावना आहे, असे भावोद्गार त्यांनी काढले आहेत.









