आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार योजनेचा शुभारंभ : 82 टक्के ग्राहकांची नोंदणी
बेळगाव : गृहज्योती योजनेच्या अंमलबजावणीला सुऊवात झाली असून शनिवार दि. 5 रोजी या योजनेचा राज्यभरात शुभारंभ होणार आहे. बेळगावमध्येही जिल्हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात 8 लाख 25 हजार 700 लाभार्थी ग्राहकांनी गृहज्योतीसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांना गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने 200 युनिटपर्यंत वीजबील माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गृहज्योती योजनेच्या अंमलबजावणीला सुऊवात झाली. ज्या ग्राहकांनी 28 जुलैपर्यंत गृहज्योतीसाठी नोंदणी केली त्या ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्राहकांनी मागील वर्षभरात वापरलेली वीज व त्याची युनिटची सरासरी काढली जाणार आहे. त्यामध्ये 10 टक्के रक्कम राज्य सरकारकडून दिली जाणार असून त्यावरील विद्युत बिल ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्यामुळे मर्यादित वापर करणाऱ्या ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात शून्य रुपयांची बिले दिली जात आहेत. बेळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात 10 लाख 35 हजार 163 विद्युत ग्राहक आहेत. त्यापैकी 9 लाख 97 हजार 878 ग्राहक गृहज्योती योजनेला पात्र ठरतात. यापैकी 8 लाख 25 हजार 700 ग्राहकांनी गृहज्योतीसाठी नोंदणी केली आहे. एकूण ग्राहकांच्या संख्येपैकी 82 टक्के ग्राहकांनी नोंदणी केल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले. शनिवार दि. 5 ऑगस्ट रोजी राज्यासह बेळगावमध्येही गृहज्योती योजनेचा शुभारंभ होणार आहे. कुमारगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 11 वाजता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. कलबुर्गी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी केले जाणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, हेस्कॉमचे ग्राहक यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत होते.
शहरात 1 लाख ग्राहकांना होणार लाभ
बेळगाव शहरात 1 लाख 65 हजार 609 विद्युत ग्राहक आहेत. त्यापैकी 1 लाख 53 हजार 132 ग्राहक या योजनेला पात्र ठरतात. त्यापैकी 1 लाख 6 हजार 839 ग्राहकांनी सरकारकडे गृहज्योतीसाठी नोंदणी केली आहे. त्यातील 58 हजार 761 बेळगाव उत्तर तर 48 हजार 78 ग्राहक बेळगाव दक्षिणमध्ये आहेत.
ग्राहकांना शून्य रुपयांचे बिल दिले जाणार
गृहज्योती योजनेची बेळगावमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी या योजनेचा शुभारंभ असून त्यानंतर ग्राहकांना या योजनेतील शून्य रुपयांचे बिल दिले जाणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
– विनोद बी. करुर (कार्यकारी अभियंता हेस्कॉम)









