अथांग अशा अंतराळात कृष्णविवर किंवा ब्लॅकहोल नामक धोकादायक स्थाने असतात. हा शोध फार पूर्वीच लागलेला आहे. कृष्णविवर हा एक मृत तारा असतो. प्रचंड वेगाने तो स्वतःभोवती फिरत असतो. त्याच्या कार्यकक्षेत गुरुत्वाकर्षणाची तीव्रता इतकी प्रचंड असते, की सूर्यप्रकाशही त्यातून बाहेर निसटू शकत नाही. त्यामुळे त्याला कृष्णविवर किंवा ब्लॅकहोल असे म्हणतात. अवकाश संशोधकांनी सर्वात वेगाने वाढणाऱया एका कृष्णविवराचा शोध लावला आहे. हे कृष्णविवर आणि त्याचे प्रभाव क्षेत्र गेली 900 कोटी वर्षे कणाकणाने वाढत आहे आणि प्रत्येक सेकंदाला त्याची वाढ पृथ्वीच्या विस्ताराइतकी होत आहे. या कृष्णविवराचे वस्तूमान आपल्या सूर्यापेक्षा 300 कोटी पट मोठे असल्याचे दिसून आले आहे. पृथ्वीवरील अंधाऱया जागेतून शक्तीशाली दुर्बिणीद्वारा या कृष्णविवराचे दर्शन होऊ शकते, असे ऑस्ट्रेलियातील नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे. या कृष्णविवराचे निरीक्षण गेली पन्नास वर्षे होत आहे. तथापि, ते सर्वात वेगाने वाढणारे कृष्णविवर आहे, याचा शोध नुकताच लागला आहे.

काही महिन्यांपूर्वी संशोधकांनी आपली सूर्यमाला असणाऱया मिल्की-वे या आकाशगंगेतील सॅगिटॅरियस नामक कृष्णविवराचा शोध लावला होता. मात्र, सध्या शोधून काढलेले कृष्णविवर त्यापेक्षाही 500 ते 600 पट मोठे आहे. ते इतके मोठे आहे, की आपल्या सूर्यमालेच्या एकंदरीत विस्तारापेक्षाही कित्येक अब्जपटीने त्याचे विस्तार क्षेत्र आहे. तसेच विश्वातील सर्वसामान्य ताऱयांच्या तुलनेत त्याचे तेज सात हजार पट अधिक आहे. मिल्की-वे पासून 500 कोटी प्रकाशवर्षे दूर असणाऱया दोन आकाशगंगा एकमेकींवर आदळल्यामुळे हे कृष्णविवर तयार झाले आहे.









