कदापिही जमीन देणार नसल्याचा निर्धार : सर्वच गावांचा रिंगरोडला विरोध :
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडमध्ये झाडशहापूरच्या शेतकऱ्यांनाही नोटीस आल्या होत्या. त्या नोटिसा घेऊन शनिवारी सर्व शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आपली उपस्थिती दर्शविली. त्याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे सांगितले. त्यावर सुनावणी झाली आहे. आता रिंगरोडमधील सर्वच गावांतील शेतकऱ्यांचे म्हणणे मांडून सुनावणी पूर्ण झाली आहे. आता पुढील आदेशाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
रिंगरोडमध्ये झाडशहापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबरच अनेक घरेही जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण गावच भूमीहीन आणि बेघर होणार आहे. त्यामुळे झाडशहापूर ग्रामस्थांनी रिंगरोडला कडाडून विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. याबाबत रास्तारोकोदेखील केला होता.
या सर्व शेतकऱ्यांना नोटिसा आल्यामुळे त्यांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. सदर जमीन सुपीक असून आम्हाला तेवढीच जमीन शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही जमीन देऊ शकणार नाही, असे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही. तसेच हा रिंगरोड पूर्णपणे रद्द करावा, असे म्हणणे मांडले आहे.
रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. 1200 एकरहून अधिक जमीन जाणार असून तालुक्यातील शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या रस्त्याला तीव्र विरोध केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थितीत राहून आपण जमीन देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी अचानकपणे जाऊन सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी झाडशहापूर येथील शेतकऱ्यांचे म्हणणे मांडण्यासाठी अॅड. शाम पाटील, अॅड. महेश मोरे, शेतकरी रमेश नेमाणी गोरल, मल्लाप्पा गोरल, भरमा सुतार, कृष्णा गोरल, कल्लाप्पा गोरल, बाबु गोरल, भरमा गोरल, पुंडलिक गोरल, किरण नंद्याळकर, हणमंत बेळगावकर, भरमा नंदिहळ्ळी, नागेंद्र नंदिहळ्ळी, हणमंत नावगेकर, अशोक कोलकार, पूजा गोरल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









