संतिबस्तवाड येथे इलेक्ट्रिकल लाईन कामाच्या सर्व्हेसाठी प्रयत्न
वार्ताहर /किणये
संतिबस्तवाड येथे रिंगरोडचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलाच जाब विचारून त्यांना पिटाळून लावले आहे. सदर प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. यामुळे रिंगरोडला आमचा विरोध असतानाही प्रशासनाकडून शेतकऱ्यांना डावलून सर्व्हे करण्याचे कामकाज सुरू करण्यात येत असल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. रिंगरोड प्रस्तावामध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिकल लाईन कामाचा सर्व्हे करण्यासाठी शुक्रवारी संतिबस्तवाड येथे अधिकारी आले होते. ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना तीव्र विरोध केला आणि जाब विचारला. यावेळी या सर्व प्रकाराबाबत आपल्याला अधिक माहिती नाही. आम्ही केवळ रिंगरोड प्रस्तावामध्ये येणारे इलेक्ट्रिकल लाईन काम व विद्युत खांबांसंदर्भात सर्व्हे करण्यासाठी आलो होतो. यापुढे येणार नाही, असे सांगून तेथून अधिकाऱ्यांनी काढतापाय घेतला. रिंगरोड प्रस्तावाला शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला विरोध दर्शविला आहे. या रिंगरोडमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे रिंगरोडला आपला कायम विरोध आहे, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला असून शुक्रवारी आलेल्या अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. शिर्डी येथील साई पॉवर कंट्रोल या कंपनीचे अधिकारी शेखर काजोल टेक्निकल कंट्रोलर व त्यांचे सहकारी कर्मचारी सर्व्हे करण्यासाठी आले होते, अशी माहिती माजी सदस्य आर. के. पाटील यांनी दिली. य् ाावेळी महादेव बिरजे, मोहन देसाई, शावेल गोन्साल्विस, बाळाराम पाटील, मारुती होनगेकर, नागेश आंबोळकर, संतोष आंबोळकर, राहुल आंबोळकर, गजानन आंबोळकर, महादेव हरगुडे, लक्ष्मण लोहार, सुरेश लोहार, कृष्णा येळेबैलकर, सोमनाथ परीट, शिवा सिद्धनवर, भरत मराठे, किरण लोहार आदींसह शेतकरी उपस्थित होते.









