सेन्सक्स 638 अंकांनी घसरणीत, सलग सहाव्या सत्रात बाजारात दबाव
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झालेली पहायला मिळाली. जागतिक अस्थिर स्थिती त्याचप्रमाणे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निवडणुकीतील एक्झिट पोल अंदाजाचा परिणाम बाजारावर दिसला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 638 अंकांनी घसरत 81050 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 218 अंकांनी घसरत 24795 अंकांवर बंद झाला. दुपारच्यावेळी सेन्सेक्समध्ये इंट्रा डे दरम्यान जवळपास 1 हजार अंकांनी सेन्सेक्स कोसळला होता. त्यानंतर मात्र बाजार सावरताना दिसला. सुरुवातीच्या सत्रामध्ये दोन्ही बाजारांची तेजीने सुरुवात झाली होती. सोमवारी महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग 1.42 टक्के वाढत 360 रुपयांवर बंद झाले.
यासोबत आयटीसीचे समभाग 1.33 टक्के वाढत 510 रुपयांवर तर दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे समभाग 1.29 टक्के वाढत 1662 रुपयांवर बंद झाले होते. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसही तेजीसोबत कार्यरत होती. 0.85 टक्के वाढीसह कंपनीचे समभाग 1934 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे अदानी पोर्टसचे समभाग 4 टक्क्यांपर्यंत घसरत 1355 रुपयांवर बंद झाले. त्यासोबत एनटीपीसीचे समभाग 3.5 टक्के घसरत 415 रुपयांवर, स्टेट बँकेचे समभाग 3.27 टक्के घसरत 770 रुपयांवर आणि पॉवरा ग्रिडचे समभाग 2.93 टक्के घसरत 328 रुपयांवर बंद झाले. अॅक्सिस बँकेचे समभागसुद्धा 2.78 टक्के कमकुवत दिसून आले.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास निफ्टी आयटी 0.66 टक्के वाढत 42191 अंकांवर बंद झाला. यानंतर निफ्टी ऑटो निर्देशांक 0.46 टक्के घसरत 25807 अंकांवर तर निफ्टी फार्मा 0.51 टक्के घसरत 22978 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 1.91 टक्के कमकुवत होत 50479 या स्तरावर बंद झाला. माध्यम निर्देशांकसुद्धा 3.65 टक्के घसरलेला होता.
चीनमधील सरकारने प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केल्याने विदेशी गुंतवणुकदारांनी त्या देशामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले. या दरम्यान भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 37 हजार कोटी रुपये काढले आहेत. गेल्या सहा सत्रामध्ये पाहता सेन्सेक्स निर्देशांक 4786 अंकांनी घसरणीत राहिला आहे.