वार्ताहर/ काकती
यंदाचा गळीत हंगाम दिवाळीपूर्वी चालू करण्याचा निर्णय झाला असून उसाला प्रति टन रुपये 2700 दर देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना ऊस बिलाची ही रक्कम दोन हप्त्यात देणार आहे. शेतकऱयांनी आपल्या कारखान्याला ऊस गाळपासाठी आणावा, असे आवाहन मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी विश्वासार्हतेने केले.
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा बुधवारी उत्साहात पार पडली. कार्यक्रमात दिवंगत नेते व मान्यवरांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार होते. व्यासपीठावर व्हा. चेअरमन तानाजी पाटील, संचालक मनोहर हुक्केरीकर, भरत शानभाग, अनिल कुट्रे, बसवराज घाणगेर, भाऊराव पाटील, परशुराम कोलकार, मनोहर होनगेकर, सद्याप्पा राजकट्टी, लक्ष्मण नाईक, संचालिका नीलिमा पावशे, वसुधा म्हाळोजी व प्रभारी व्यवस्थापक निर्देशक के. एल. श्रीनिवास उपस्थित होते.
पोतदार पुढे म्हणाले, आम्ही गेली पंधरा वर्षे अनेक अडथळे पार करत कारखान्याचे धुरांडे पेटविले. कारखान्याचे माजी विश्वस्त रामभाऊ पोतदार, शट्टप्पण्णा पाटील, गुरुनाथ कुट्रे आदींचे स्वप्न साकारले. मीच कारखाना चालवू शकतो, असा कोणी किमयागार नाही. तुमच्या हाती सोपवून निवृत्त होणार आहे, असे भावोद्गार काढताच उपस्थित सर्व सभासद, भागधारकांनी तुमच्या नेतृत्वाखाली कारखाना चालवा, अशी भावनिक साद दिली.
शिवाजी कुट्रे यांनी एक हजार रुपये शेअर्स भरलेल्यांनाही सवलतीत साखर द्यावी, अशी मागणी केली.
कारखाना लीजवर चालविण्यास देण्यावर सभासदांचा आक्षेप
सभेपुढील विषय मांडताना लीज आधारावर देण्याचा विचारविनिमय प्रस्ताव चेअरमन अविनाश पोतदार यांनी मांडला. यावेळी संतोष पाटील बेळगाव, लक्ष्मण पाटील काकती, भावकाण्णा काकतीसह काही सभासदांनी आक्षेप घेतला. लीजवर कारखाना चालविण्यासाठी दिल्यानंतर भागधारकांचे अस्तित्व राहत नाही. संचालक मंडळावर आमचा विश्वास आहे, असे मत व्यक्त केले. पोतदार म्हणाले, कारखाना आर्थिक अडचणीत असताना मोठे कष्ट उपसावे लागले. याकरिता माझ्या घरातील पैसे दिले. संचालक मंडळांनीही पैसा उभा करण्यासाठी योगदान दिले. घेतलेली कर्जे परतफेड करताना वन टाईम सेटलमेंटद्वारे 50 कोटी कारखान्याला सूट घेऊन वाचविले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून विशेष बैठकीत भागधारकांच्या संमतीने ठरवूया, असे सांगितले.









