माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा : युतीबाबतच्या अटकळांना पूर्णविराम,
प्रतिनिधी/ बेंगळूर
काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली हे खरे आहे, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले. याद्वारे निजद वरिष्ठ नेत्यांनी निजद आणि भाजपमधील युतीबाबत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. बेंगळूरच्या राजवाडा मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या निजद कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
देवेगौडा पुढे म्हणाले, एच. डी कुमारस्वामी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष प्रेम आणि विश्वास आहे. दिल्लीत 2018 मध्ये ‘तत्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन नव्याने शपथ घ्या. बिहारच्या नितीशकुमार यांच्याप्रमाणे तुम्हाला दीर्घकाळ मुख्यमंत्री बनवण्याची जबाबदारी माझी आहे, असे ते म्हणाले होते. पण, मला पाहून कुमारस्वामींनी मोदींची ऑफर नम्रपणे नाकारली होती, त्यांनी स्पष्ट केले. भाजप-निजद युतीची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. निजद कुठे आहे?, आम्ही 28 पैकी किमान 24 जागा जिंकू. भाजपच्या वाट्याला 4 जागा जाऊ शकतात, अशा चर्चा गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. याचे उत्तर देण्याची आता वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
नवीन युतीच्या नैतिकतेबद्दल काही जण बोलत आहेत. मी दिल्लीत कोणाला भेटलो याविषयी काहीही गुपित नाही. पण, नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या राज्यातील कोणत्या नेत्यांमध्ये इतकी नैतिकता आहे, याचे विश्लेषण मी करू शकतो. तथापि, वैयक्तिक टीका हा माझा हेतू नाही, वयाच्या 91 व्या वषी अशा गैरवर्तनातून मी काय साध्य करू शकतो, असेही देवेगौडा म्हणाले.









