महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यावर आणि प्रत्येक पक्षाला मिळालेले संख्याबळ लक्षात घेतल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संधान बांधले आणि अनोखा प्रयोग केला. खरंतर तो जनमताचा अनादर आणि सत्तेसाठीची कोलांटी होती. पण अनोखा प्रयोग असे त्याला संबोधले गेले. शरद पवारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आणले आणि भाजपला विरोधी बाकावर बसवले.शरद पवार यांचा हा सत्तेचा प्रयोग खुपच गाजला आणि नरेंद्र मोदी, भाजप यांना रोखण्यासाठी पवार यांची कसरत भाजप विरोधकात चर्चेचा विषय बनली आणि त्यातून पुढे इंडी आघाडीचा जन्म झाला. भाजपला रोखण्यासाठी सारे भाजप विरोधक स्वतंत्र अस्तित्व ठेवून एकत्र झाले. त्यांचे संघटन झाले व इंडीचे नेतृत्व कॉंग्रेसकडे, राहुल गांधींकडे सोपवण्यात आले. इंडीच्या चार दोन बैठका झाल्या. कर्नाटकात भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इंडी आघाडीची मात्रा योग्य झाली अशी खात्री झाली आणि लोकसभा निवडणुकीत इंडीने जोर पकडला. राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रा काढली. शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नितीश कुमार, उद्धव ठाकरे वगैरे वगैरे सारे एकत्र आले. संविधान आणि राखीव जागा यावरुन रान पेटवले गेले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार रोज भाजपाला आणि मोदी-शहांना टीकेचे लक्ष बनवू लागले. त्याचा परिणाम लोकसभेत विरोधकांना सत्ता नाही पण नेतेपद मिळेल इतकं यश आले. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाले. पण मध्यंतरीच्या काळात जनादेश डावलणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. महाराष्ट्रातील सत्ता गेली व आता 2024 च्या निवडणुकीत उद्वव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मतदारांनी लाथाडली. आता पाच वर्षं ना केंद्रात सत्ता, ना राज्यात सत्ता, जोडीला अनेक भानगडी, प्रकरणे चव्हाट्यावर येऊन चौकशी कारवाईचा बडगा त्यामुळे इंडी आघाडीत घालमेल सुरु झाली. इंडी आघाडीचा चेहरा कोण असावा यावरुन वाद सुरु झाला आहे. देशात राजकारण म्हणजे सत्तेचेच असा एक नवा प्रवाह रुढ होताना दिसतो आहे. त्यामुळे इंडी आघाडीत नेते पदावरुन दोन तट पडताना दिसत आहेत. इंडी आघाडी नेतृत्व राहुल गांधींकडून ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवावे अशी मागणी व तशा हालचाली आता सुरु झाल्या आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तेथे विरोधक केवळ दंगा करुन, घोषणा देऊन कोणतेच कामकाज होऊ देताना दिसत नाहीत तर राज्यसभेत सभापती धनकड यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला आहे. तो मंजूर होतो नाही हे कळेलच. पण संसदेत विरोधी नेता म्हणून राहुल गांधी कमी पडत आहेत अशी टीका सुरु झाली आहे. त्यावरून इंडी आघाडीत दोन तट पडले आहेत शरद पवार, लालू यादव यांनी इंडीचे नेतेपद पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेकडे सोपवावे असे म्हटले आहे तर उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड वगैरे नेते इंडीचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे असे सांगू लागले आहेत. थोडक्यात सत्तेसाठी एकत्र आलेले विरोधक सत्ता मिळाली नाही सत्ता मिळणार नाही म्हणून बिथरले आहेत. यामध्ये आतले राजकारण उद्योगपती अदानी यांच्याशी संबंधित आहे. राहुल गांधींची गाडी अदानी या विषयावर थटली आहे. ती पुढे सरकायला तयार नाही आणि अदानी हे शरद पवार, ममता बॅनर्जी यांनाही जवळचे आहेत. देशाचे सर्वोच्च सभागृह लोकसभा, संसद ही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, संवादासाठी वापरले पाहिजे पण बहिष्कार, घोषणाबाजी आणि हेवे दावे, आरोपप्रत्यारोप यामुळे कामकाज होत नाही. राहुल गांधींची प्रभावी विरोधीपक्ष नेता उत्तम संसदपटू आणि सर्व विरोधकांची वज्रमूठ बांधणारा नेता अशी प्रतिमा अपेक्षित आहे पण तसे होत नसल्याने इंडी आघाडीत नेते पदावरुन घालमेल सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा आपले हिंदू कार्ड आठवू लागलंय. तथापि इंडी आघाडीसाठी त्यांना राहुल गांधी हवे आहेत, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पूर्ववत हिंदू हिंदू नामजप सुरु केल्याने त्यांची नवी मतदार पेटी विस्कटू लागली आहे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते प्रयत्नशील आहेत. पण देशात इंडी आघाडी आणि महाराष्ट्रात विकास आघाडी अडचणीत दिसते आहे. जे पेरले तेच उगवते हा न्याय राजकारणातही लागू होताना दिसत आहे. तोंडावर मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समीप आहेत. भाजप महायुती त्या तयारीला लागली आहे. ठाकरेंना मुंबई महापालिकेतून बाहेर काढायचे या निर्धाराने फडणवीस, शिंदे कामाला लागले आहेत तर पवार ठाकरे हे ईव्हीएमवरुन दंगा करत रडीचा डाव खेळताना दिसत आहेत. जे राज्यात सुरु आहे तेच देशात सुरु आहे. लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आणि लोकशाहीत मतदारांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याऐवजी केवळ राजकारण एके राजकारण सुरू आहे आणि ते बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळेच जनता लाथाडत आहे आणि सक्षम एकसंघ विरोधीपक्ष ही अपेक्षा फोल ठरत आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेतच आता इंडी आघाडीने नवा नेता केला तर दुहेरी धार येईल व भाजपा संपेल असा युक्तिवाद केला जातो आहे पण ते खरे कारण नाही. चेहरा कुणाचा हा वाद आता दिल्लीतही सुरु झाला आहे. राहुल गांधीना बदलून इंडी आघाडीचे प्रमुख इतरांना करायचे, चेहरा बदलायचा तर ममता बॅनर्जींचाच का? उध्दव ठाकरे का नकोत तोच चेहरा योग्य वगैरेही सुरु आहे तूर्त दारुण पराभव आणि पाच वर्षे देशात, महाराष्ट्रात सत्ता नाही हे लक्षात आल्याने मासे तडफडत आहेत. लवकरच विरोधी इंडी आघाडीत तोडफोड दिसली तर आश्चर्य नाही. देवेंद्र फडणवीस यांची टीम आता मंत्रीमंडळ विस्तार, नागपूर हिवाळी अधिवेशन, खातेवाटप आणि मुंबई महापालिका यासाठी अॅक्टिव्ह झाली आहे.
Previous Articleएस. एम. कृष्णा अनंतात विलिन
Next Article टी-20 मालिकेत द. आफ्रिकेची विजयी सलामी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








