अफताब पूनावालाविरोधात 6,600 पृष्ठांचे आरोपपत्र, न्यायलयाकडून दखल
दिल्ली / वृत्तसंस्था
अफताब पूनावाला याने त्याची लिव्ह इन जोडीदार श्रद्धा वालकर हिचा खून करुन तिच्या मृतदेहाचा चेहरा बर्नर आणि ब्लो टॉर्चचा उपयोग करुन जाळला अशी माहिती पोलासांनी आरोपपत्रात नमूद केली आहे. हे 6,600 पानांचे आरोपपत्र दिल्लीच्या न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेऊन पुढील न्यायालयीन कारवाईचा आदेश दिला आहे.
या आरोपपत्रातील आशय आता स्पष्ट होत असून अनेक धक्कादायक बाबींचा त्यात समावेश आहे. पूनावाला याने पोलिसांची कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, यावरही आरोपपत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे. श्रद्धाचा खून केल्यानंतर त्याने जवळच्या हार्डवेअर दुकानातून एक अरी (धारदार साधन), तीन पोलादी पाती, एक हातोडा आणि प्लास्टिकच्या क्लिप्स यांची खरेदी केली. मृतदेह न्हाणीघरात नेऊन प्रथम हात तोडले. ते पॉलिथिन पिशवीत बांधले. नंतर ही पिशवी स्वयंपाकघराच्या कॅबिनेटमध्ये ठेवली. नंतर पाय कापून त्यांचेही असे पॅकिंग केले. मृतदेहाचे त्याने चार पाच दिवसांमध्ये 35 तुकडे केले.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
श्रद्धा वालकर हिची हाडे ग्राईंडरमध्ये घालून त्यांचे पीठ केले, अशी माहिती त्याने पोलिसांना त्यांची दिशाभूल करण्यासाठी दिली होती, असेही आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर पुढच्या दिवशी रात्री 2 वाजता त्याने तिच्या पायांचे भाग छतरपूरच्या जंगलात पुरुन नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाचे तुकडे त्याने पुढचे दोन तीन आठवडे त्याच्या घरातील 300 लीटरच्या फ्रीझमध्ये ठेवले होते. ते त्याने टप्प्याटप्प्याने जंगलात नेऊन पुरल्याची माहिती आरोप पत्रात देण्यात आली आहे. 18 मे या दिवशी त्याने तिची गळा दाबून हत्या केली. त्यापूर्वी त्यांच्यात रेल्वे तिकीटे रद्द करण्यावरुन कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.









