वेंगुर्ले / महेंद्र मातोंडकर :
मऊ–मऊ वाळूत पाय रोवुनी
देऊ झटका दोरा ओढुनी
पतंग जातील वर–वर चढुनी
पंख नको त्याजला,
गड्यांनो पतंग उडवू चला…!
बालभारतीच्या पुस्तकातील ही प्रसिद्ध कविता साक्षात जगायची असेल तर आज वेंगुर्ल्यात आपली पावले वळवावी लागतील. कारण जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय 360 डहाणू व टीम मेंगलोर टीमद्वारे वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरील मऊशार पांढऱ्या शुभ्र वाळूवर पाय रोवून विविधरंगी, विविधढंगी पतंगबाजीचा गगनचुंबी आविष्कार ‘याची देही याची डोळा’ अनुभवन्याची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग सहाव्या पतंग महोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली असून शनिवार 22 व रविवार 23 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून वेंगुर्ल्याचा समुद्रकिनाऱ्यावर विविध आकाराचे पतंग पहायला मिळणार आहेत.
भारतात प्राचीन काळापासून पतंगबाजी मोठ्या उत्साहाने केली जाते. कालांतराने पतंगबाजीमुळे अनेकांना नाहक त्रास झाल्याने यात बदल होत गेला. ही पतंगबाजी आता सुरक्षित ठिकाणी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून केली जात आहे. काचेचा वापर करून पंतगाचा बनविला जाणारा धारधार ‘मांजा’ आता हद्दपार झाला आहे. तर पतंग काटण्याचे खेळही कालबाह्य झाले आहेत. फक्त आनंद मिळविणे आणि आपली प्राचीन संस्कृती जपणे या हेतूने पर्यटन क्षेत्रात पतंगबाजीचा वापर होऊ लागला आहे. वेंगुर्ल्यातील ‘माझा वेंगुर्ला’ या सामाजिक संस्थेने याच हेतूने वेंगुर्ल्यात आठ वर्षापूर्वी पतंग महोत्सव भरविला होता. मेंगलोर येथील टिमने यासाठी माझा वेंगुर्ला संस्थेला सहकार्याचा हात दिला होता. त्यानंतर सलग सहावर्षे हा पतंग महोत्सव वेंगुर्ल्यातील सांस्कृतिक अंगाचा एक अविभाज्य घटक म्हणून पुढे आला आहे.
पतंग हवेत उडवणे हा एक आकर्षक व मनोरंजक क्रीडा प्रकार आहे. त्यासाठी विशिष्ट कौशल्य लागते. दोन पातळ कामट्यांना कागद चिकटवून पतंग तयार करतात. त्यातील उभ्या कामटीला ‘तिड्डा’ तर आडव्या कमानीसारख्या कामटीला ‘कमान’ म्हणतात. पतंगाला खाली लांब शेपटी जोडतात. पतंग आकाशात उंच उडवता यावा, म्हणून त्याला लांब दोरा बांधलेला असतो. त्यास तिड्डा व कमानी यांच्याविऊद्ध बाजूस ‘किन्ना’ बांधतात. पतंग हे विविध आकारांचे व प्रकारांचे असून ते कागद, कापड वा प्लास्टिक यांपासून बनवितात. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ टरेन्टमचा आर्काईटस याने इ. स. पू. पाचव्या–चौथ्या शतकांत पतंगाचा शोध लावला असे मानले जात असले, तरी आशिया खंडात तो त्यापूर्वी अनेक वर्षे ज्ञात असावा, असे दिसते. जगभर पतंगबाजीची क्रेझ आहे. पर्यटन क्षेत्रात या पतंगबाजीचा आता कौशल्याने वापर होत आहे.
पर्यटनदृष्ट्या वेंगुर्ल्याचे नाव सर्वदूर पसरविणे याच हेतूने या महोत्सवाचे आयोजन त्याकाळी वेंगुर्ल्यातील जाणत्या व सजग नागरिकांनी एकत्र येत केले होते. आज हा महोत्सव म्हणजे वेंगुर्ल्याची वेगळी ओळख बनली आहे. पतंग महोत्सवाला होणारी गर्दी व त्यामुळे वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्याला मिळालेले ग्लॅमर या पर्यटन विकासात भर घालणाऱ्या आहेत. गेली आठ वर्षे वेंगुर्ल्यात हा महोत्सव साजरा होत आहे व त्याची किर्तीही सर्वदूर पसरली आहे. कोरोना काळात छोटी विश्रांती घेऊन पुन्हा या महोत्सवाची लहर वेंगुर्लेभर पसरली आहे.
वेंगुर्ल्यातील सागरेश्वर व बागायत समुद्रकिनाऱ्यावर या पतंगबाजीचा नेत्रदीपक सोहळा साजरा केला जाणार आहे. माझा वेंगुर्लाच्या टीमने या महोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. उभादांडा ग्रामपंचायतीचे यासाठी सहकार्य माझा वेंगुर्लाला लाभले आहे. तर बागायतवाडी व सागरेश्वर येथील ग्रामस्थांनीही पतंग महोत्सवासाठी पुरेपुर सहयोग दिला आहे. टीम मेंगलोर व टीम फ्लाय 360 डहाणूचे असंख्य सदस्य पतंगबाजीचे प्रदर्शन घडविण्यासाठी वेंगुर्ल्यात दाखल झाले आहेत. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, वातावरण याचा अभ्यास जागा निवडण्यात आली आहे. छोटेखानी स्टेज, विविध खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल, फनीगेम्सचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी व करावके सिंगिंगचेही आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार व रविवारच्या सायंकाळच्या सत्रात वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील आकाश रंगीबेरंगी विविध आकाराच्या पतंगांनी भरून जाणार आहे. जिल्ह्यातील पतंगप्रेमींनाही या महोत्सवात उपस्थित राहून पतंग उडविण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या पतंग महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन माझा वेंगुर्ला संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.








