इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्युमाँटचे मत, भारताचा इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना उद्यापासून
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
मायदेशातील महिलांच्या दोन कसोटींमध्ये भारताची कामगिरी कशी होते त्यावर कसोटी मालिकेचा विस्तार अवलंबून असेल, असे मत इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्युमाँट हिने व्यक्त केले आहे. भारतीय महिला संघ 14 डिसेंबरपासून इंग्लंडविऊद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर 21 ते 24 डिसेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविऊद्ध एक कसोटी खेळली जाणार आहे.
ड्रेसिंग रूममधील आमच्यापैकी प्रत्येकाला अधिकाधिक कसोटी क्रिकेट खेळायला आवडेल. आमच्याविरुद्धच्या कसोटीत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीदरम्यान भारत कशी कामगिरी करतो हे पाहण्यात मला रस आहे, असे ब्युमाँटने मंगळवारी इंग्लंडच्या सराव सत्रानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. जर हे कसोटी सामने चांगले रंगले, तर मी भविष्यात अव्वल कसोटी खेळणाऱ्या देशांविऊद्ध दोन किंवा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची अपेक्षा करू शकते, असे ती पुढे म्हणाली.
ब्युमाँट म्हणाली की, जरी मैदानावर इंग्लंडच्या महिला संघाची मानसिकता पुऊष संघाच्या बाझबॉलच्या दृष्टिकोनासारखी दिसत नसली तरी, खेळाला वेग देण्याचा प्रयत्न करण्याच्या बाबतीत त्यांची मूल्ये समान आहेत. ‘मानसिकता अगदी सारखीच आहे, आम्हालाही नेहमीच खेळ वेगाने पुढे न्यायचा असतो आणि गोलंदाज तसेच फलंदाजांना दबावाखाली ठेवायचे असते. आमचा दृष्टिकोनही बळी मिळविण्याचा असतो’, असे तिने सांगितले.
अॅशेसमध्ये वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना बेन स्टोक्स सिली पॉईंटवर राहिल्यानंतर क्षेत्ररक्षणात जेवढी गंमत आली तशी परिस्थिती येथे कदाचित नसेल. पण आम्ही केवळ इंग्लंडमधीलच नव्हे, तर जगभरातील महिला क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला प्रेरित करू इच्छितो, असे या सलामीच्या फलंदाजाने सांगितले. ब्युमाँट म्हणाली की, कसोटी क्रिकेटची कमतरता असूनही, यजमान भारताला परिस्थितीची अधिक कल्पना असणे तिला अपेक्षित आहे.
नियमित कसोटी सामने खेळल्यामुळे आम्हाला वाढ साध्य करून इथपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे परंतु भारतीय संघ गेल्या 10 वर्षांत जितका खेळलेला नाही त्यापेक्षा जास्त गेल्या 2-3 वर्षांत खेळलेला असेल. मला खात्री आहे की, त्यांनी त्यातून धडे घेतलेले आहेत आणि कदाचित त्यांना डी. वाय. पाटील स्टेडियमवरील खेळपट्टीची थोडी अधिकच माहिती असेल. कारण भारतीय खेळाडू येथे महिला प्रीमियर लीगमध्ये आणि इतर वेळीही खेळलेल्या आहेत, याकडे तिने लक्ष वेधले. ब्युमाँटने जूनमध्ये महिलांच्या अॅशेस कसोटीत 208 धावा केल्या होत्या. ही खेळी आपल्या खेळाचे नवीन पैलू दाखविणारी होती, असे ती म्हणाली.









