कोल्हापूर / विनोद सावंत :
राज्यशासनाने रेशनकार्डधारकांची ‘ई’ केवायसी करणे बंधनकारक केले आहे. शासनाने यासाठी तिसऱ्यांदा दिलेली वाढीव मुदतही सोमवारी संपली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे 4 लाख लाभार्थ्यांचे अद्यपी ‘ई’ केवायसी झालेली नाही. शासनाने ‘ई’ केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांची सविस्तर माहिती देण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत.
राज्यातील सर्वच रेशनकार्डवरील लाभार्थ्यांना धान्याची गरज आहे का, रेशनकार्डवरील मृत, स्थलांतरितांची नावे वगळण्यात आली आहेत का? आदी माहिती संकलित करण्यासाठी राज्यशासनाने ई केवायसी बंधनकारक केली आहे. ई केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. दुसऱ्यांदा दिलेली 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदत वाढ संपली. यानंतर राज्य शासन आणखीन दोन महिने म्हणजे 30 जुनपर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली होती. परंतू यामध्येही कोल्हापूरातील सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी होवू शकलेली नाही. अद्यपी सुमारे 4 लाख लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे. अंतिम मुदतही संपल्याने शासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्व रेशन कार्डधारक, रेशन दुकानदार यांचे लक्ष लागून राहिले आहे.
- केवायसी नसणाऱ्यांची माहिती मागविली
केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यातील सचिवांना ‘ई’ केवायसी संदर्भात पत्र पाठविली आहेत. यामध्ये ‘ई’ केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांची 14 जुलैपर्यंत सविस्तर माहितीची मागणी केली आहे. यानुसार महाराष्ट्र राज्य शासनाचे सचिवांनी राज्यातील सर्व पुरवठा विभागाना यानुसार माहितीची मागणी केली आहे.
- ई केवायसीत राज्यात टॉववर येण्याची संधी
कोल्हापूर जिह्यात अद्यपी 4 लाख लाभार्थ्यांची ई केवायसी झालेली नाही. हे वास्तव असले तरी ई-केवायसी पूर्ण करण्याच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच 25 लाख लाभार्थंचे आधार सिंडींग झाले आहे. केवळ तांत्रिक कारणामुळेच ई केवायसी होत नाही.
जिल्ह्यात रेशनची दुकाने –1 हजार 685
अंत्योदय योजनेचे शिधापत्रिका धारक –51 हजार 811
प्राधान्य कुटुंब योजनेचे शिधापत्रिकाधारक- 5 लाख 35 हजार 425
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी –25 लाख 22 हजार 155
केवायसी झालेले लाभार्थी –सुमारे 21 लाख
ई केवायसी झाले नसलेले लाभार्थी संख्या – सुमारे 4 लाख
- 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करा
पॉज मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे ई केवायसी करण्यात अडचण येतात. तसेच लहान मुलांचे, वयोवृद्ध लोकांचे, शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्याचे बोटाचे ठसे येत नाहीत. तांत्रिक अडचणीसोबत सध्या पूरस्थिती आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
-डॉ. रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ
- ई केवायसी नसणाऱ्या लाभार्थ्यांचा लवकरच अहवाल
ई केवायसीची वाढीव मुदत संपली आहे. मुदत वाढीबाबत अद्यपही निर्णय झालेला नाही. या उलट ई केवायसी होत नसलेल्या रेशनकार्डधारकांची माहिती देण्याचे आदेश शासनानी दिले आहेत. यामध्ये ई केवायसी का होत नाही याची कारणे देण्याचे म्हटले आहे. ही माहिती संकलित करून लवकरच अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.
-मोहणी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी








