इस्रालयने सादर केले ठोस पुरावे : बायडेन यांचीही मान्यता, दहशतवाद्यांवरच उलटला डाव
वृत्तसंस्था / तेल अवीव
गाझा पट्टीच्या दक्षिण भागातील एका रुग्णालयात भीषण स्फोट होऊन 500 हून अधिक पॅलेस्टाईनी ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा स्फोट इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यांचा आहे, असा आरोप प्रथम हमास आणि इराणकडून करण्यात आला होता. तथापि, तो स्फोट दहशतवादी संघटना इस्लाम जेहादकडून झाला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. इस्रायलने या संदर्भातील ठोस पुरावे सादर केले आहेत. इस्लामी जेहाद या संघटनेने इस्रायलवर अग्निबाण सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु नेम चुकल्याने तो अग्निबाण गाझा पट्टीतील अल अहली या रुग्णालयावर कोसळला. त्यामुळे झालेल्या स्फोटात किमान 500 पॅलेस्टाईनी ठार झाले.

अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनीही इस्रायलच्या पुराव्यांना दुजोरा दिला आहे. हा स्फोट ‘विरुद्ध बाजू’कडून झालेला आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी इस्रायलच्या दौऱ्यावर आल्यानंतर केले. बायडेन हे बुधवारी दुपारी इस्रायलच्या एक दिवसांच्या दौऱ्यावर पोहचले. तेल अवीव येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी नेतान्याहू यांची गळाभेट घेऊन इस्रायल विरोधकांना योग्य तो संदेश दिला आहे.
पंतप्रधान मोदींकडून निषेध
रुग्णालयातील स्फोटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. हा स्फोट ज्यांच्यामुळे घडला त्यांच्यावरच त्याची जबाबदारी आहे, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. या स्फोटात मृत झालेल्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रदेशात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
स्फोटाचा आरोप
बुधवारी पहाटे गाझा पट्टीतील रुग्णालयात प्रचंड स्फोट झाला. या रुग्णालयात अनेक पॅलेस्टाईनी नागरीकांनी आसरा घेतला होता. या स्फोटात 500 हून अधिक ठार झाल्याचा दावा त्वरित हमास आणि पॅलेस्टाईनी प्रशासनाने केला आणि इस्रायलवर याची जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला. या स्फोटाची त्वरित जगभर प्रतिक्रिया उमटली. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनिओ गट्रेस यांनी इस्रायलचा निषेध केला. या स्फोटाचे सत्य आम्ही उजेडात आणू, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी व्यक्त केली. इराण आणि काही इस्लामी देशांनी इस्रायलवर शाब्दिक आग ओकण्यास प्रारंभ केला आणि सर्व दोष त्याच्यावर ढकलला.
इस्रायलकडून इन्कार
हा स्फोट घडविल्याचा इन्कार इस्रायलने केला आहे. या स्फोट इस्रायलच्या विमान हल्ल्यांमध्ये झाला नसून इस्लामिक जेहाद या दहशतवादी संघटनेच्या नेम चुकलेल्या अग्निबाणामुळे झाला आहे. हा अग्निबाण या संघटनेकडून इस्रायलवर टाकण्यात येणार होता. पण नेम चुकल्याने तो काही अंतरावर असलेल्या गाझा पट्टीतील रुग्णालयावर पडला. त्यामुळे हानी झाली. ही कबुली पॅलेस्टाईन अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी संभाषणांमधून मिळत आहे. इस्रायलने हे दूरध्वनी संभाषण पकडले असून प्रसिद्धही केले आहे. त्यामुळे हा स्फोट कसा झाला याचे गूढ उकलले असून इस्रायलच्या यात काहीही हात नाही, हे देखील स्पष्ट झाले आहे, अशी शाश्वती अनेक तज्ञांनी आणि अभ्यासकांनीही दिली आहे.
हमास आयएसआयएसपेक्षाही भयानक
हमास ही दहशतवादी संघटना आयएसआयएस या इस्लामी दहशतवादी संघटनेपेक्षाही भयानक आहे. तसेच इस्रायलवर याच संघटनेने निर्घृण हल्ला केला असून इस्रायलला आपल्या संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. गाझा पट्टीतील रुग्णालयात झालेला स्फोट विरुद्ध बाजूकडूनच झाला आहे, ही बाब स्पष्ट हात होत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केले आहे. ते बुधवारी काही तासांच्या इस्रायल दौऱ्यावर आले होते. त्यांची नेतान्याहू यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी सदैव राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. नेतान्याहू यांनी त्यांचे सहकार्यासंदर्भात आभार मानले.
जॉर्डनची भेट रद्द
इस्रायलनंतर बायटेन जॉर्डनला भेट देऊन तेथील राजाशी चर्चा करणार होते. तथापि, गाझा पट्टीतील स्फोटानंतर ही भेट आणि दौरा रद्द करण्यात आला. जॉर्डनची राजधानी अम्मान येथे ईजिप्त आणि काही इस्लामी देशांच्या प्रमुखांशी त्यांची चर्चा होणार होती. तथापि, ही चर्चाही रद्द करण्यात आल्याने ते केवळ इस्रायलला भेट देऊन अमेरिकेला परतले असल्याचे वृत्त देण्यात आले.
हल्ले सुरुच
इस्रायलकडून हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांवरचे हल्ले सुरुच आहेत. इस्रायलच्या बाँबफेकीत हिजबुल्लाचे किमान 8 दहशतवादी दक्षिण लेबेनॉनमध्ये ठार झाले. राजधानी बैरुटच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये इस्रायलने जोरदार बाँबवर्षावर करुन लेबेनॉन आणि हिजबुल्लाची अनेक लष्करी आस्थापने नष्ट केल्याचे वृत्त आहे. हमासविरोधातही कारवाई सुरुच आहे.
नागरीकांना निर्वाणीचा इशारा
गाझा पट्टीच्या उत्तर भागात जे पॅलेस्टाईनी नागरीक अद्यापही आहेत, त्यांनी त्वरित दक्षिण गाझामध्ये निघून जावे. तेथे त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी यांची सोय केली जाईल, असे प्रतिपादन इस्रायलने केले आहे. इस्रायलची सेना उत्तर गाझा पट्टीत प्रवेश करण्यासाठी सज्ज असून योग्य परिस्थिती निर्माण होताच भूमीवरील हमासच्या विरोधातील युद्धास प्रारंभ होणार हे स्पष्ट करण्यात आले.
दिवसभरात…
ड बायडेन यांचा इस्रायल दौरा, नेतान्याहू यांच्याशी सविस्तर चर्चा
ड अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी, बायडेन यांचा पुनरुच्चार
ड गाझा पट्टीत स्फोट विरुद्ध बाजूकडूनच, बायडेन यांचे प्रतिपादन
ड हमासला संपविल्याखेरीज विश्रांती घेणार नाही, इस्रायलचा निर्धार









