दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ए. बी. डीव्हिलियर्सने केली बदल होण्याची मागणी
वृत्तसंस्था/ डर्बन
भारत आणि दक्षिण आफ्रिका नुकत्याच संपलेल्या मालिकेत केवळ दोन कसोटी सामने खेळल्याबद्दल माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ए. बी. डीव्हिलियर्सने नाराजी व्यक्त केली आहे आणि या परिस्थितीसाठी जगभरातील ‘टी-20’ लीगच्या प्रसाराला जबाबदार धरले आहे. जर जगातील सर्वोत्कृष्ट संघ शोधायचा असेल, तर यात काहीतरी बदल होणे आवश्यक आहे,, असे त्याने म्हटले असून दीर्घ मालिकेचा पुरस्कार केला आहे.
दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनमधील सलामीची कसोटी जिंकल्यानंतर केपटाऊनमध्ये भारताने दोन दिवसांत विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडविली. ‘तिसरी कसोटी नाही याचा मला आनंद झालेला नाही. यासाठी जगभरात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेटला जबाबदार धरावे लागेल’, असे डीव्हिलियर्सने त्याच्या ‘यु-ट्यूब’ चॅनलवर म्हटले आहे. ‘कोणाला दोष द्यायचा हे मला कळत नाही. पण काही तरी चुकत आहे असे मला वाटते. तुम्हाला सर्व संघ स्पर्धा करताना पाहायचे असतील आणि जगातील सर्वोत्तम कसोटी संघ कोण हे पाहायचे असेल, तर काहीतरी बदलले पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका पुन्हा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीच फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडला जाणार आहे. तथापि क्रिकेट ‘दक्षिण आफ्रिका’ने या मालिकेसाठी दुय्यम संघाची घोषणा केल्याने भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अजूनपर्यंत मुख्य संघातून न खेळलेला नील ब्रँड या संघाचे नेतृत्व करेल. ही मालिका दक्षिण आफ्रिकेच्या ‘टी-20’ लीगच्या वेळी होणार असल्याने असे करण्यात आले आहे. सदर लीग 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान होणार असून त्यामध्ये बहुतेक आघाडीचे दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू खेळणार आहेत.
डीव्हिलियर्सला वाटते की, कसोटी क्रिकेट दडपणाखाली आहे आणि त्याने कबूल केले की, खेळाडू आणि प्रशिक्षक अशा स्पर्धांचा पर्याय निवडतील ज्यात भरपूर पैसा मिळतो. यामुळे क्रिकेट जगताला हादरे बसले आहेत आणि कसोटी क्रिकेटवर दडपण असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. इतकेच नव्हे, तर अगदी एकदिवसीय क्रिकेट आणि संपूर्ण यंत्रणा टी-20 क्रिकेटकडे वळत आहे, याकडे त्याने लक्ष वेधले. खेळाडू, क्रिकेट मंडळे आणि प्रशिक्षक जिथे जास्त पैसे असेल तेथे वळतील. आपल्या कुटुंबासह आपल्या भविष्याचा विचार ते करत असल्याबद्दल तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही, असे डीव्हिलियर्सने म्हटले आहे.









