तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन : वयाच्या 73 व्या वर्षी अमेरिकेत अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ मुंबई, सॅन फ्रान्सिस्को
जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री निधन झाले. हृदयावरील आजारामुळे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी उस्ताद यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संगीत आणि कला क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या आहेत.
हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून ते हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती त्यांचे मित्र आणि महान बासरीवादक राकेश चौरसिया रविवारी सायंकाळीच दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला होता. ‘सध्या त्यांची तब्येत गंभीर असून आम्ही सर्वजण चिंतेत आहोत’ असे राकेश चौरसिया म्हणाले होते. त्यानंतर रात्री त्यांच्या निधनाची वार्ता जारी करण्यात आली.









