गणेशोत्सव आठवडाभरावर असताना पीओपी गणेशमूर्ती विक्रीवर निर्बंध कितपत योग्य
बेळगाव : ‘वरातीमागून घोडे किंवा उशिरा सूचलेले शहाणपण’ अशा म्हणी काही हेतूनेच तयार झाल्या असाव्यात. सध्या अनेक बाबतीत बेळगावकरांना त्याची प्रचिती येत आहे. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच राज्याच्या पर्यावरण खात्याने पीओपी गणेशमूर्ती विक्रीवर निर्बंध घातले आहेत. गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असताना या आदेशाची कार्यवाही होणे केवळ अशक्य आहे. कदाचित पर्यावरण खात्याला आणि प्रशासनाला सुद्धा याची कल्पना असावी. पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाचे नुकसान होते. प्रामुख्याने पाणी प्रदूषित होते. हे सर्वश्रुत आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही पीओपींच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी घालण्यात सरकारला, पर्यावरण खात्याला अपयशच आले आहे. तरीसुद्धा आपण कारवाई केली, असे भासविण्यासाठी तरी निदान आदेश काढणे आणि काही मूर्ती जप्त करून अंमलबजावणी केली जाते. यासाठी तरी पर्यावरण खात्याला आदेश काढणे भाग पडले असावे.
हा तिढा नवीन नाही, दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की असा आदेश निघतोच. वास्तविक हा आदेश काटेकोरपणे अमलात यायचा असेल तर त्याबाबत मूर्तिकारांचे समुपदेशन आणि चर्चा आवश्यक आहे. पाऊस सुरू झाला की मूर्ती वाळत नाहीत. त्यामुळे जानेवारीपासूनच मूर्तिकार मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. पीओपी मूर्तींची ने-आण करताना त्यांना तडा जात नाही. त्यामुळे मंडळे आणि मूर्तिकार पीओपीवर भर देतात. पुन्हा शाडू किंवा माती उपलब्ध होण्याचा प्रश्न आहेच. दुसरीकडे स्थानिक पातळीवर जागृती केली तरी बेळगावमध्ये बाहेर गावाहून असंख्य मूर्ती मागविल्या जातात. त्या सर्व पीओपीच्याच असतात. त्याबाबत पर्यावरण खाते किंवा प्रशासन कोणती भूमिका घेणार, त्यांच्यावर बंदी कशी घालणार? हा प्रश्न आहे. आता सर्व मूर्ती जवळजवळ तयार झाल्या आहेत. मंडळांनी नोंदणी केली आहे. उत्सव जवळ आल्यावर मूर्ती जप्त करणे हे संयुक्तिक ठरणार नाही.
नागरिकांचेही समुपदेशन करणे आवश्यक
पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे हा एक पर्याय असू शकतो. शिवाय मोठ्या मूर्ती मोठ्या जलाशयाशिवाय विसर्जित करणेही अशक्य आहे. पर्यावरण खात्याला जर खरोखरच प्रदूषण रोखावयाचे असेल तर घरोघरी बसविल्या जाणाऱ्या श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी त्यांनी पर्याय द्यायला हवा. अर्थात पर्यावरण खात्याचे फिरते वाहन दरवर्षी उपलब्ध होते परंतु या वाहनांची संख्या वाढायला हवी. तसेच किमान प्रत्येक भागात एक वाहन उभे करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी नागरिकांचेही समुपदेशन करणे आवश्यक आहे.
अलीकडे लोकही पर्यावरणाबाबत किमान जागृत झाले आहेत. आपल्या घराच्या अंगणात किंवा बागेमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे प्रमाण वाढायला हवे. त्याचप्रमाणे घरोघरी बसविणाऱ्या श्रीमूर्ती किमान माती किंवा शाडूच्या असाव्यात. याचाही भाविकांनी विचार करायला हवा. पर्यावरण धोक्यात आले तर मानवी जीवनही धोक्यात येते. हे सर्वांनीच समजून घेणे आवश्यक आहे. उत्सव तोंडावर आला असताना अशा पद्धतीचा आदेश हा प्रभावी ठरणार नाही. हे पर्यावरण खात्यानेही लक्षात घ्यायला हवे.
परगावाहून येणाऱ्या मूर्तींबाबत उपाययोजना करू
याबाबत पर्यावरण अधिकारी गोपाळकृष्ण यांच्याशी संपर्क साधता, त्यांनी हा आदेश आता आला असला तरी यापूर्वीही असा आदेश आला असून त्याबाबत सर्व मूर्तिकारांना माहिती देण्यात आली होती. बेळगावच्या मूर्तिकारांना एकत्र बोलावून त्यांचे समुपदेशन करून जागृतीही केली होती, असे ते म्हणाले. तथापि, परगावाहून येणाऱ्या मूर्तींबाबत विचारणा करता पुढच्या वर्षी त्याबाबत आपण नक्की उपाययोजना करू. दरवर्षीच आम्ही मूर्तिकारांना शाडू किंवा मातीच्या मूर्ती कराव्यात, असा आग्रह धरतो. त्याची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल, याकडे आता विशेष लक्ष देऊ, असे ते म्हणाले.
– गोपाळकृष्ण सतसंगी, पर्यावरण अधिकारी










