महागाई असूनही बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी : सार्वजनिक, घरगुती गणेशमूर्ती घरी नेण्यास प्रारंभ
पणजी : गणेश चतुर्थी उत्सवाची तयारी घरोघरी पूर्ण होत आली असून विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्तमंडळी सज्ज झाली आहेत. उद्या मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी असून महागाईचे चटके सहन करीत भक्तजन आनंदाने ती साजरी करण्याच्या मुडमध्ये दिसून येत आहेत. बाल-गोपाळ तसेच तऊण मंडळींचा उत्साह तर काही विचाऊच नका! अशी परिस्थिती आहे. राज्यातील गावागावात तसेच शहरातूनही चतुर्थीचा उत्साह दिसत असून शालेय मुलांना तर आठवडाभर सुट्टी असल्याने ती फारच खुषीत आहेत. शिवाय सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना मंगळवार, बुधवार असे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
बाहेरगावी नोकरी – व्यवसायानिमित्त स्थायिक झालेली गोमंतकीय मंडळी चतुर्थीसाठी गावात परतली असून ते आठवडाभर राहून या गोव्यातील चतुर्थी उत्सवात मोठी भर घालतात. घरोघरी गणेशाची सजावट तसेच रंगरंगोटी करण्याचे काम पूर्ण होत आले असून आता फक्त बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. उद्या मंगळवारी गणरायाचे आगमन घरोघरी होणार असून त्याचे स्वागत पारंपरिक पद्धतीने मनोभावे, जल्लोषात करण्यात येणार आहे. गोव्यात सार्वजनिक गणपती व गणेश मंडळे यांची संख्या वाढत असून सध्या राज्यात प्रमुख शहरात, गावात सार्वजनिक गणेशोत्सव दिमाखात साजरा करण्यात येतो. त्यात विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम समाविष्ठ असल्याने लोक उत्सुकतेने ते पाहण्यासाठी गर्दी करतात. जवळजवळ 10 ते 11 दिवस हे कार्यक्रम चालतात आणि त्यामुळे लोकांचे भरपूर मनोरंजन होते. एरव्ही रविवारच्या सुट्टीदिवशी गोव्यात शांतता असते, वाहतूक कमी असते परंतु काल रविवारी जनतेची बरीच मोठी गर्दी बाजारात उसळली होती. महागाई असली तरी लोकांची खरेदी पाहून चतुर्थीत त्याचा फारसा विचार करीत नाहीत हेच दिसून येते. आता गणेश चतुर्थीत भजने, सत्यनारायण पुजा, आरती यामुळे एकंदरित राज्यातील सर्व वातावरण मंगलमय होणार आहे.