पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये निवडणूका आहेत. आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगाल. यामध्ये केवळ आसाममध्ये भाजपचे राज्य आहे तर इतर चारमध्ये विरोधी अथवा गैरभाजप पक्षांची सरकारे आहेत. ज्या पद्धतीने या निवडणूकांचे वारे वाहत आहेत त्याने सध्यातरी हिमंत बिस्व शर्मा यांचे आसाममधील सरकार धोक्यात दिसत आहे. भाजप त्या राज्यात सत्ता टिकवू शकली तर तो चमत्कारच मानावा लागेल. त्यामुळे पुढील वर्ष भाजपच्या माथी या राज्यांमध्ये उन्हाळाच असल्याने यंदाची बिहारची निवडणूक काहीतरी करून जिंकायची असा चंग भाजपने बांधलेला आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सत्ताधारी रालोआ एकत्र राहिली तर बिहारची निवडणूक भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांसाठी जड नाही असे आजचे वातावरण असले तरी राज्यकर्त्यांना कोणताही चान्स घ्यायचा नसल्यानेच त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाने अचानक स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) सुरु केली आहे असा विरोधकांचा आरोप आहे. ही मतदार छाननी मोहीम म्हणजे विरोधकांच्या महागठबंधंनाचे समर्थक असलेल्या मुस्लिम आणि यादव समाजाला मोठ्या प्रमाणावर मतदारयादीतून काटण्याचा डाव आहे असे आरोप होत आहेत. एक माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी ज्यापद्धतीने हे सारे काम चालले आहे त्यावर चिंता व्यक्त केलेली आहे. 35 लाख लोक मतदारयादीतून काढले गेले आहेत असे दावे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे वैशिष्ट्या हे की प्रत्येक निवडणूक ते शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकण्याच्या इराद्याने लढवतात. ते साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करत विरोधकांचे कांडात काढतात हा आरोप फार काळ त्यांच्यावर लागलेला आहे. महाराष्ट्रात देखील तो लागला. तो कितपत बरोबर अथवा चूक ते ज्याचेत्याने ठरवावे. त्यांनी निवडणूक आयोगाला देखील आपले बटीक बनवलेले आहे असे दावे देखील बऱ्याच काळापासून होत आहेत.
बिहारमध्ये भाजपपुढे चिक्कार आव्हाने आहेत. अगदी ताजे आव्हान म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे. गेल्याच आठवड्यात एका रुग्णालयात शिरून पाच जणांनी एका खुनाच्या प्रकरणातील दोषीला गोळ्या घालून कसे मारले ते जगाने पाहिले. त्याअगोदर एका उद्योगपतीची घरा समोर हत्या करण्यात आली. लालू यादव यांच्या ‘जंगल राज’ कारभारावर आगपाखड करून 2005 साली सत्तेवर आलेल्या नितीशना त्याच कारणासाठी जावे लागणार काय अशी कुजबुज सुरु झाली आहे. भाजपच्या पोटात त्यामुळे गोळा आला असला तर नवल नाही.
नितीश कुमार यांनी प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 125 युनिट वीज मोफत देण्याची केलेली घोषणा म्हणजे दिवसेंदिवस निवडणुकीतील चुरस वाढत आहे हे नक्की. त्यांना काहीही करून येती निवडणूक जिंकायची आहे.
नितीश कुमार यांना ‘एकनाथ शिंदे’ बनवण्याची मनीषा भाजप बरेच काळ बाळगून आहे. आणि येती निवडणूक म्हणजे ‘हीच ती वेळ’ असेही काहीजणांना वाटते. ‘अभी नही तो कभी नही’ असे त्याचे म्हणणे. आजारांनी पिडलेल्या नितीशना आताच बाजूला सारले नाही तर पुढील निवडणूकीपूर्वी वेगळेच चित्र उभे राहू शकते असे हा गट म्हणतो. नितीशना गोडीगुलाबीने बाजूला सारण्यासाठी त्यांचा आत्तापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेला एकुलता एक मुलगा निशांत कुमार याला राजकारणात सक्रिय करण्याची चाल सुरु झालेली आहे.
नितीश यांचा पक्ष भाजपने आतून पोखरून काढलेला आहे. नितीश यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी काहीजण भाजपला मिळालेले आहेत हे एक उघड गुपित आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कधीकधी नितीश हे अद्वा-तद्वा बोलतात किंवा काही विचित्र कृती करतात, त्यामुळे त्यांच्याजवळचा गट कधी त्यांना एकटा सोडत नाही. नितीशना नुकत्याच भेटलेल्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याला पंधरवड्यापूर्वी देखील हाच अनुभव आला. पण नितीश यांनी गेल्या 20-25 वर्षात एक कृतिशील आणि सेक्युलर नेता म्हणून जी कुंजी कमावली आहे ती मोठी असल्याने त्यांना बळजबरीने ‘एकनाथ शिंदे’ बनवणे शक्य नाही हे देखील भाजपने जाणलेले आहे. बिहारचे निवडणुकीचे गणितच असे आहे की नितीशनी जर का विरोधकांकडे उडी मारली तर भाजपला केवळ अंगठा चोखण्याशिवाय काही काम राहणार नाही.
अशा वेळी ‘एक धक्का और दो’ हे तंत्रदेखील भाजपने सुरु ठेवलेले आहे. प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष हा नितीश आणि त्यांच्या पक्षाला खाली खेचण्यासाठी या निवडणुकीत कामाला लागलेला आहे. एकेकाळी नितीश यांच्या पक्षातील नंबर दोनचे नेते असलेले प्रशांत आता त्यांच्या मुळावरच उठलेले आहेत. नितीश यांचा मुख्यमंत्री म्हणून कारभार इतका ढिसाळ आहे की त्यांच्या पक्षाला 243 पैकी जास्तीतजास्त 25 जागा मिळू शकतात असा किशोर यांचा दावा आहे. 25 पेक्षा एकही जागा जास्त पडली तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशी देखील त्यांनी घोषणा केलेली आहे.
गमतीची गोष्ट अशी की प्रशांत किशोर यांच्या सभांना दिवसेंदिवस जास्त गर्दी होत असल्याने राजकीय निरीक्षक तसेच इतर राजकीय पक्ष बुचकळ्यात पडलेले आहेत. मोदी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अमरिंदर सिंग, एम के स्टालिन, नितीश अशा भल्याभल्याना निवडणुकीच्या रणनीतीत मदत करून सत्तेवर आरूढ केलेल्या किशोर यांना बिहारचा पुढील मुख्यमंत्री व्हायचे आहे. कोणी म्हणतात की किशोर यांची नजर खरोखर त्याच्यावरच्या पदावर आहे. एव्हढ्या तालेवार नेत्यांच्या संगतीत राहिल्याने आणि त्यांना आपल्या ओंजळीने पाणी पाजणाऱ्या किशोर यांना आस्मान ठेंगणे वाटते अशी चर्चा आहे. अमित शहा यांनी सिफारीश केल्याने आपण किशोर यांना आपल्या पक्षात मोठे पद दिले होते असे एकदा नितीशनी सांगितले होते. यातून किशोर आणि भाजपचे काही साटेलोटे आहे अशी चर्चा सुरु झालेली आहे. नितीशना खाली खेचण्याचे एककलमी काम त्यांनी सुरु केलेले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकले पाडलेल्या मोदी-शहा यांना मात्र नितीशनी आत्तापर्यंत वरचढ होऊ दिलेले नाही. त्यांच्या संयुक्त जनता दलाला एकदादेखील बहुमत मिळाले नसताना गेली 20 वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. कधी भाजप आणि कधी राजदचा पाठिंबा घेऊन त्यांनी सत्ता बिनदिक्कत सांभाळली आहे. यातील कोणतेही समर्थक दल त्रास देऊ लागले तर अगदी एका रात्रीत जणू त्यांनी टोपी फिरवून ‘पलटू राम’ असे मिश्किल टोपण नाव ‘कमावले’ आहे. थोडक्यात काय तर बिहारच्या राजकारणावरील आपली मांड ढिली होऊ दिलेली नाही. कधी विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार समजले जाणारे नितीश हे बिहारमध्ये आपल्या पोळीवर तूप वाढून घेण्यात यशस्वी राहिलेले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चिराग पासवान यांना वेगळी निवडणूक लढवण्याचा डाव खेळून नितीश यांच्या पक्षाला 243 सदस्यीय विधानसभेत केवळ 40 च्या सुमारास गुंडाळले होते. पण तरीही मुख्यमंत्रीपदी नितीश हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिले होते. बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांना भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त मते चाचण्यांमध्ये मिळत आहेत. याचा अर्थ येता मुकाबला चुरशीचा आहे. काँग्रेसने देखील तेजस्वीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे काम सुरु केलेले आहे. बिहारमध्ये एका दलित नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवून काँग्रेसने एक चांगले काम केलेले आहे. राजकीयदृष्ट्या बिहार हे अतिशय ज्वलंत राज्य आहे. ते काय संदेश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2027 ला उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. दोन्हीही राज्य भाजपकरता अतिमहत्त्वाची. त्याकरता आत्तापासून प्रत्येक निवडणुकीत आकाश पाताळ एक करण्याचे काम मोदी-शहा यांनी सुरु केलेले आहे. राजकीयदृष्ट्या बिहार हे अतिशय ज्वलंत राज्य. त्यामुळे ते काय कौल देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सुनील गाताडे








