कोल्हापूर / विनोद सावंत :
शाहूपुरी पाच बंगला, राजारामपुरीतून रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने कोट्यावधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेला सरकता जिना सुरू कमी आणि बंदच जास्त वेळ राहत आहे. याच ठिकाणी तिकीट विक्री केंद्राची इमारत उभारली आहे. परंतू त्याचा आतापर्यंत वापर झालेला नाही.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे राज्यातील सर्वात जुने आणि प्रमुख रेल्वे स्थानक आहे. याची इमारतही 137 वर्षापूर्वीची हेरिटेज वास्तू आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे या स्थानकाचे नियंत्रण केले जाते. या स्थानकावरुन सुमारे 40 लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय रेल्वेला वर्षाला 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
कोल्हापुरातून सध्या मुंबई, पुणे, नागपूर, तिरुपती, सोलापूर, दिल्ली, अहमदाबाद, धनबाद अशा शहरांकडे किमान 10 गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे. मॉडेल रेल्वेस्थानकामुळे सध्या कोल्हापूरच्या स्थानकावर स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जाते. सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानकावर चार प्लॅटफार्म आहेत. यावरून एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या सोडल्या जातात.
कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाला गती मिळाली आहे. 43 कोटींच्या निधीतून येथील रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण केले जात आहे. परंतू यापूर्वी स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या सेवांकडे मात्र, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शाहूपुरी भाजी मंडईच्या बाजूला रेल्वे प्रशासनाने सुमारे कोट्यावधींचा निधी खर्च करून सरकता जिना केला आहे. परंतु त्यांचा वापर प्रवाशांसाठी फारसा होताना दिसून येत नाही. सरकता जिना केवळ रेल्वे सुटण्याच्या वेळे पूर्वी सुरू होतो. त्यानंतर बंदच असतो. परिसरातील काही विक्रेते कारण नसताना सरकता जिन्याचा वापर करत असल्यावरून रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे समजते. रेल्वे सुटण्याच्या वेळामध्येच प्रवासी रेल्वे स्थानकावर येतातच असे नाही. बहुतांशी प्रवासी रेल्वेत जागा मिळण्यासाठी अगोदर येऊन स्थानकावर थांबलेले असतात. राजारामपुरी मार्गे येणाऱ्या अशा प्रवाशांना सरकता जिन्याचा उपयोग होत नाही. पायऱ्यावरून धापा टाकतच प्लॅटफॉर्मवर यावे लागते. या उलट रेल्वेतून कोल्हापुरात दाखल झालेल काही प्रवासी शाहूपुरी भाजी मंडईकडे जाताना बंद सरकत्या जिन्यावरून जात असल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळे नेमका सरकता जिना करण्यामागे काय उद्देश होत। असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नुतनीकरणावर 43 कोटी खर्च, जुन्या सुविधा मोडकळीस
अमृत भारत योजनेतून मंजूर झालेल्या 43 कोटींच्या निधीतून कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण आणि आधुनिकीकरण केले जात आहे. दुसऱ्या बाजूला सरकता जिन्या सारख्या प्रवाशांच्या गरजेच्या सुविधा धुळखात पडल्या आहेत, असे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे.
साडेतीन वर्षापासून धुळखात पडलेले तिकीट घर
एकीकडे रेल्वे स्टेशनमधील तिकीट काऊंटरवर प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतात. तिकीट एटीएम मशिनच्या ठिकाणीही अशीच स्थिती असते. ही गर्दी कमी व्हावी. तसेच राजारामपुरीतून येणाऱ्या प्रवाशांना शाहूपुरी भाजी मंडई येथील रेल्वेच्या प्रवेशद्वाराजवळच तिकटी मिळण्याची सोय व्हावी. येथील प्रवाशांना तिकीटासाठी रेल्वे स्टेशनवरील मुख्य तिकीट केंद्र येथे यावे लागू नये म्हणून सरकता जिन्याच्या जवळच तिकीट घराची इमारत उभारली. साडेतीन महिने ही इमारत उभारून झाले असून वापराविना धुळखात पडून आहे.
राजारामपुरीतून रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनने सरकता जिन्याची सोय केली आहे. परंतू याचा फारसा कोणीही फायदा घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वेने केलेल्या सुविधेचा फायदा घ्यावा. तसेच रेल्वे प्रशासनाने येथील बंद असणारे तिकीट विक्री केंद्रही त्वरीत सुरू करणे आवश्यक आहे.
शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे रेल्वे प्रवासी सल्लाकार समिती








