थरूर यांनी सिंधू करार स्थगित करण्याचे सांगितले कारण
वृत्तसंस्था/ बोगोटा
भारताने पाकिस्तानसोबत सिंधू जल करार चांगला हेतू आणि सौहार्दाच्या भावनेसह 1960 मध्ये केला होता, परंतु मागील 4 दशकांपासून पाकिस्तानकडून पुरस्कृत दहशतवादामुळे या चांगल्या हेतूचा वारंवार अपमान झाला आहे. भारत आता केवळ आत्मरक्षणाच्या स्वत:च्या अधिकाराचा वापर करत असल्याचे उद्गार सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी कोलंबियात काढले आहेत.
दशकांपर्यंत दहशतवाद आणि संघर्ष झेलल्यावरही हा करार लागू राहिला, परंतु आता वर्तमान भारत सरकारने हा करार स्थगित केला आहे. हा करार भारताने 1960 च्या दशकात चांगला हेतू अणि सौहार्दासोबत पाकिस्तानशी केला होता. कराराच्या प्रस्तावनेत हे शब्द आहेत. परंतु या चांगल्या हेतूचा वारंवार दहशतवादी हल्ल्यांद्वारे उल्लंघन झाले. भले आम्ही दहशतवाद आणि युद्धाला सामोरे गेलो तरीही करार लागू राहिला, परंतु यावेळी आमच्या सरकारने हा करार स्थगित केला आहे. याचा अर्थ कराराचे कामकाज पाकिस्तानकडून समाधानकारक संकेत मिळत नाही तोवर रोखण्यात आले असल्याचे थरूर म्हणाले.
दहशतवाद्यांना शिक्षा होणारच
भारत पाकिस्तानला कराराच्या अंतर्गत पाण्याचा पूर्ण हक्क देत राहिला, तर भारताने स्वत:च्या हिस्स्याचे पूर्ण पाणीही वापरले नाही. परंतु आता एकतर्फी सौहार्दाचा काळ राहिला नाही असे थरूर यांनी म्हटले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षेशिवाय सोडता येणार नाही. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी अ•dयांवर हल्ले केल्याचे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले.
पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय
22 एप्रिल रोजी भारताने पहलगाम येथे एक भयानक दहशतवादी हल्ला झेलला. जगाने याची निंदा केली, परंतु याहून पुढे कुठलीच कारवाई झाली नाही. 7 मे रोजी भारताने दहशतवादी अ•s आणि लाँच पॅड्सवर हल्ले केले. पाकिस्तानात एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला तेथील सैन्याधिकारी उपस्थित होते. यातून पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याचे दिसून येते असे उद्गार थरूर यांनी काढले.
कोलंबियाची प्रतिक्रिया निराशाजनक
थरूर यांनी कोलंबियन सरकारच्या प्रतिक्रियेवर निराशा व्यक्त केली. कोलंबियाने भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तातान मारले गेलेल्या दहशतवाद्यांबद्दल शोक व्यक्त केला, तर पहलगाम हल्ल्याच्या पीडितांबद्दल सहानुभूती दाखविणे टाळले. कोलंबियाची ही भूमिका आमच्यासाठी निराशाजनक असल्याचे थरूर यांनी सुनावले आहे. थरूर यांच्या नेतृत्वात कोलंबियाच्या दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळात शांभवी चौधरी (लोकजनशक्ति पक्ष), सरफराज अहमद (झामुमो), जी.एम. हरीश बालयोगी (तेदेप), शशांक मणि त्रिपाठी, तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कालिता (सर्व भाजप), अमेरिकेतील माजी राजदूत तरनजीत सिंह संधू आणि शिवसेना खासदार मिलिंदा देवरा सामील आहेत.









