काही दिवसांपासून चीनमध्ये मायक्रोप्लाजमा न्यूमोनिया या बॅक्टेरियाने थैमान घातलं आहे. अशातच याच बॅक्टेरियाची लागण झालेले सात रुग्ण दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले होते, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्सनी केला होता. मात्र, हा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
“चीनमध्ये थैमान घालणाऱ्या न्यूमोनिया विषाणूचे रुग्ण दिल्लीमध्ये आढळल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. मात्र, हा रिपोर्ट खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा न्यूमोनियाचा अगदी सामान्य असा व्हेरियंट आहे. दिल्लीतील एम्समध्ये आढळलेल्या रुग्णांचा आणि चीनमध्ये पसरणाऱ्या न्यूमोनियाचा काहीही संबंध नाही.” असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
“एम्सने पीसीआर आणि आयजीएम एलिसा या दोन चाचण्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा शोध लावला. या चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 3 आणि 16 टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमधील न्यूमोनियाच्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्यांना चीनमधील विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.” असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत होतं.लॅसेंट मायक्रोबने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. यात म्हटलं होतं, की एका प्रकरणात सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या पीसीआर चाचणीमुळे या विषाणूची ओळख पटली. तर बाकी सहा प्रकरणांमध्ये आयजीएम एलिसा चाचणीच्या माध्यमातून विषाणूची ओळख पटली आहे. मात्र, आता सरकारच्या स्पष्टीकरणामुळे असं काही नसल्याचं सिद्ध झालं आहे.