सर्व तालुका रुग्णालयांमध्ये ‘स्टेमी’ राबविण्याची गरज : योजनेंतर्गत 14 महिन्यांत 20385 जणांची ईसीजी तपासणी
बेळगाव : हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये हृदय तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. या कारणास्तव सध्या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील राबविण्यात येणारी डॉ. पुनीत राजकुमार हृदय संजीवनी-स्टेमी योजनेचा जिल्ह्यात सर्वत्र विस्तार करण्याची मागणी पुढे येत आहे. हृदयविकाराचा झटका असलेल्या व्यक्तीला ग्रीन अव्हरदरम्यान उपचार मिळावेत, अन्यथा मोठा धोका उद्भवू शकतो. तसेच हृदयविकार रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत, या उद्देशाने राज्य सरकारने 2024 मध्ये राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये डॉ. पुनीत राजकुमार हृदय संजीवनी-स्टेमी योजना लागू केली होती. हासन जिल्ह्यात मे-जून महिन्यात 24 जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले आहे. यामुळे भीतीपोटी नागरिक हृदय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान राज्य सरकारने हृदयविकार रुग्णांची दखल घेऊन डॉ. पुनीत राजकुमार हृदय संजीवनी-स्टेमी योजना लागू केली आहे. हुक्केरी, बैलहोंगल, सौंदत्ती, गोकाक, निपाणी, खानापूर, रामदुर्ग तालुका हॉस्पिटलमध्ये ही योजना राबविण्यात आली. मार्च 2024 पासून स्टेमी योजना जिल्ह्यात कार्यान्वित झाली.
48 जणांना स्टंट घालण्यात आले
सदर 7 तालुका हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना हृदयरोगचे प्राथमिक निदान आणि उपचारांचे प्रशिक्षण देण्यात आले. या योजनेंतर्गत 14 महिन्यात एकूण 20 हजार 385 जणांच्या ईसीजी चाचण्या करण्यात आल्या. यापैकी गंभीर हृदयरोग असलेल्या 106 जणांना आपत्कालीन उपचार मिळाले असून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे. याशिवाय औषधोपचाराने 56 जणांच्या हृदयाचे आरोग्य सुधारले आहे. शिवाय 48 जणांना स्टंट घालण्यात आले असून एका रुग्णावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना अधिकच्या प्रशिक्षणाची गरज
आरोग्य विभागाकडे दीर्घकालीन मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांच्या समस्या यासह इतर असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती आहे. अशा रुग्णांना दर तीन महिन्यांनी चाचणी करून सांगितले जात आहे. पण काहीजण करून घेतात काही याकडे दुर्लक्ष करतात. हृदयरोगाची लक्षणे आढळल्यास उपचार देण्यासाठी स्टेमी योजनेची मदत घेतली जाते. मात्र यासाठी अधिक कुशल डॉक्टर व कर्मचाऱ्यांची आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून असलेल्या डॉ. व कर्मचाऱ्यांना अधिकचे प्रशिक्षण देण्याची गरज बनली आहे.
अलिकडे हृदयविकार रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात बहुतेक तालुका रुग्णालयांमध्ये हृदयरोगाचे निदान करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे योग्य माहितीशिवाय हा आजार गंभीर बनण्याचा धोका असतो. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये डॉ. पुनीत राजकुमार हृदय संजीवनी-स्टेमी योजना लागू केली तर रोगाचे निदान करण्यात मदत होते. यामुळे प्राथमिक उपचार घेण्यात सोईस्कर होते. यासाठी स्टेमी योजना राज्यातील सर्वाधिक तालुके असेलल्या संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात विस्तार करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक व रुग्णांतून होत आहे.
हुक्केरी तालुक्यात सर्वाधिक ईसीजी
हृदयरोगावर योग्यवेळी उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. हे टाळण्यासाठी स्टेमी योजना लागू केली. ज्याचा जिल्ह्यातील अनेक रुग्णांना याचा लाभ झाला. येता काळात सर्व तालुक्यांमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. स्टेमी योजनेंगर्तत खानापूर 2014, बैलहोंगल 3513, हुक्केरी 4408, सौंदत्ती 3006, गोकाक 3000, निपाणी 2922 तर रामदुर्ग तालुक्यात 1522 जणांची ईसीजी चाचणी करण्यात आली आहे.
आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या
आधी हृदयविकार हा पन्नाशीच्या पुढील व्यक्तींमध्ये दिसून यायचा. मात्र आता तऊण पिढीलादेखील या विकाराने विळखा घातलेला दिसत आहे. जंग फूड, बैठी जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टी यात भर घालत आहेत. मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टी समाजासाठी चिंताजनक बनत चालल्या आहेत. व्यसनाधिनतेपासून दूर राहून निरोगी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पोषक आहार व नित्य व्यायामाची गरज असून, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे मत डॉ. एम. डी. दीक्षित यांनी व्यक्त केले.









