दहा-बारा दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया : सप्टेंबरपासून रब्बी हंगामाला सुरवात
अरूण टुमरी /काकती
खानापूर तालुका वगळता संपूर्ण बेळगाव जिल्हा आजही दुष्काळाच्या छायेखाली वावरत आहे. आजपर्यंत ऑगस्ट महिन्यातही सरासरीच्या तुलनेत 63 टक्के उणे पाऊस झाला आहे. जुलै पंधरवड्यानंतर एकच दिवस दमदार पाऊस झाल्याने सरासरी होणाऱ्या पर्जन्यमानापेक्षा 60 टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात झाला. ही जमेची बाजू झाल्याने पेरणीची कामे झाली. मात्र ऑगस्ट महिन्यात सरासरी पाऊस होऊ न शकल्याने पिकांच्या ऐन वाढीच्या काळात वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलाव्याअभावी उन्हामुळे पिके करपत आहेत. काही जमिनीत पुरेशा पावसाअभावी पेरणीच होऊ शकली नाही. गेल्या पाच दिवसात श्रावणातील ऊन-सावलीच्या खेळात केव्हातरी नुसतीच रिमाझिम चालू आहे.
बेळगाव, खानापूर तालुक्यातील भातरोप लागवडीचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले आहे. सप्टेंबरपासून रब्बी हंगामाला सुरवात होणार आहे. पावसाअभावी आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा कृषी उपनिर्देशक एस. बी. कोनगवाड यांची मुलाखत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. जिल्ह्यात 1 जून ते 14 ऑगस्ट या कालावधीत किमान 417 मि.मीटर पाऊस होणे आवश्यक होते. पण 383 मि. मी. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा रामदुर्गला 11 टक्के, यरगट्टी 7 टक्के, खानापूर 1 टक्के आणि रायबागला अधिक पाऊस झाला आहे. या विभागात पिके समाधानकारक आहेत. बेळगाव तालुका 34 टक्के, चिकोडी व कित्तूर 27 टक्के, बैलहोंगल 26, निपाणी 24, कागवाड 20, गोकाक 8, अथणी 6, मुडलगी 5 टक्के अशा या आकरा विभागात तुटीचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 7 लाख 10 हजार 532 हेक्टर पेरणी व लागवडीचे कृषी खात्याचे उद्दिष्ट होते. यापैकी 6 लाख 10 हजार 747 हेक्टर पेरणी झालेली आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक
जिल्ह्यात नवीन ऊस लागवड व खोडवा ऊस मिळून 2 लाख 93 हजार 63 हेक्टरात ऊस आहे. मागील सहा वर्षाच्या तुलनेत 1 लाख एक हजार 85 हेक्टरात आज अधिक उसाचे क्षेत्र आहे.
आपत्कालीन परिस्थितीत सिंचनाचे व्यवस्थापन
पावसाच्या पाण्याशिवाय खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना जिथे सिंचनाची सुविधा आहे. तेथे पिकांना पाणी देण्याचे व्यवस्थापन कसे करावे या प्रश्नावर उपनिर्देशक कोनगवाड म्हणाले, खरीप हंगामात येणारी पिके पावसाच्या पाण्यावर विनासायास येतात हा समज सध्या खोटा ठरला आहे. पाऊस लागेल म्हणून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांना मुबलक पाणी देण्याऐवजी त्यांच्या संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. जमिनीत 50 टक्के ओलावा कमी झाल्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन लक्षात घेऊन पाणी देणे गरजेचे आहे.
बाष्पीभवनामुळे पिकांना पाण्याची अधिक गरज
पिकाला शारीरिक जडणघडणीसाठी जमिनीतून शोषलेल्या पाण्याच्या केवळ 1 ते 2 टक्के पाण्याची गरज असते. उरलेले जवळपास 98 ते 99 टक्के पीक स्वत:च्या माध्यमातून पानातील छिद्रावाटे, बाष्पीभवनासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज भागविण्याकरिता वातावरणात सोडत असते. वातावरणातील बाष्पीभवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज ही तापमान, वाऱ्याची गती, सूर्यप्रकाश आणि हवेतील आर्द्रता यावर अवलंबून असते. जास्त तापमान व वाऱ्याची गती जास्त असल्यास, पाण्याची गरज जास्त असते.
हवामान खात्याच्या अंदाजावर कितपत विश्वास
मात्र पावसाच्या संशोधनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही हवामान खात्याच्या संशोधकांना पावसाचे अंदाज खरे सांगता आले नाहीत. हेच जर सांगता आले असते तर लागवड पद्धतीत तसा बदल करता आला असता याला उपनिर्देशक कोनगवाड यांनी सहमती दर्शविली. भातपीक येणाऱ्या विभागात यंदाच्या कमी पावसात सोयाबीन पीक घेता आले असते. तर काही ठिकाणी टोमॅटोचे पीक घेऊन शेतकरी बांधव लखपती झाले असते. असे ते म्हणाले. कृषीबाबत कोणताही सल्ला हवा असेल तर जवळच्या रयत संपर्क केंद्रात अथवा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना भेटून पीक-पाण्याबाबत सल्ला घ्यावा असे शेतकरी बांधवांना आवाहन केले.









