अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा जे ज्ञानी असतात ते हा संसार समूळ नश्वर आहे हे जाणून देह अजरामर करण्याच्या तथाकथित विधीचा आदर करत नाहीत. त्यात ते लक्षसुद्धा घालत नाहीत. परंतु मिथ्या देहाचा जो अभिमान धरतो त्याने अजरामर होण्याच्या इच्छेने केलेले प्रयत्न त्याचे देहबंधन दृढ करतो. त्यामुळे त्याला सतत जन्ममरण भोगावे लागते. ज्याप्रमाणे अजरामर होण्यासाठी तप करणाऱ्या साधकाचे देहबंधन दृढ होते, त्याचप्रमाणे जो साधक समाधीतून बाहेर आल्यावर मी म्हणजे हा देह असे समजू लागतो. त्याचा योगसाधनेतून प्राप्त झालेल्या सिद्धी अक्षरश: छळ करतात. त्यासाठी योग्याने त्यांचा उपभोग घ्यावा म्हणून त्या त्याचा पिच्छा पुरवतात. ह्यावरून उद्धवा तुझ्या लक्षात आले असेलच की, योगसाधनेच्या सफलतेत सिद्धी ही एक मोठीच धोंड आहे. देहाच्या माध्यमातून साधक योगाभ्यास करत असतो. योगसाधना करत असताना साधकाला सिद्धी प्राप्त होत असतात. महत्प्रयासाने योगाभ्यास करत असलेल्या साधकाच्या मार्गात त्या बाधा निर्माण करतात. बरे मला सिद्धी नकोत असेही योगी म्हणू शकत नाही. त्यामुळे साधकाच्या योगसाधनेच्या साफल्यात सिद्धींची प्राप्ती हा एक अडथळाच ठरतो. योगसमाधीत असलेल्या साधकाला तो आत्मरूप असल्याने समोर दिसणाऱ्या संसाराचा आणि त्याचा काहीही संबंध नाही ह्याची जाणीव असल्याने तो निर्विचार अवस्थेत असतो परंतु तो जेव्हा समाधीतून भानावर येतो तेव्हा त्याला त्याने अर्जित केलेल्या सिद्धींची जाणीव होते. त्याचबरोबर मी देह आहे हे असे वाटून ते त्या सिद्धींचा भोग घेतात. त्यातून त्यांचे देहबंधन दृढ होते. योगसाधना करूनसुद्धा जो देहबंधन दृढ करतो त्याचं अध:पतन चुकत नाही. म्हणून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी योगसाधना करत असताना, मार्गात सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा त्याग करावा कारण त्या सिद्धी निजस्वार्थ जागृत करतात. जो राजाच्या जवळचा असतो त्याला लाच खाण्याची संधी आपोआपच प्राप्त होते आणि त्यातून त्याचे स्वरूप उघडकीस आले की, त्याचा घोर अपमान होतो. त्याप्रमाणे जो योगसाधना करत असतो. त्याला सिद्धी प्राप्त होण्याची संधी आपोआपच चालून येते परंतु त्यांचा भोग घेण्याच्या मोहात तो अडकला की, त्याचा घात झालाच म्हणून समज. राजाच्या जवळ वावरणाऱ्या सेवकाला लाच घेण्याचा मोह अनावर होतो. त्याप्रमाणे कैवल्यसाक्षात्काराच्या जवळ पोहोचलेल्या साधकालाच सिद्धींचा उपभोग घेण्याची जास्तीतजास्त संधी उपलब्ध होते. सिद्धींची भूल पडून जर तो त्यांच्या मोहात अडकला तर कैवल्यसाक्षात्कार होणे तर दूरच उलट अपमानास्पदरित्या योगभ्रष्ट होऊन केलेली सर्व साधना मातीमोल होते. ह्याच्यापेक्षा घोर अपमान कुठलाच नाही. म्हणून ज्याप्रमाणे झाडाला कितीही गोड, रसाळ, मधुर फळे लागलेली असली तरी ते झाड त्याकडे ढुंकूनही बघत नाही. त्याप्रमाणे सिद्धीचे सोहळे जरी वाटणीला आले तरी साधकाने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे आणि वैराग्यपूर्ण समाधानाने त्यांचा त्याग करावा. मुळातच वैराग्य अंगी बाणणे हेच योगसाधनेचे मोठे फळ आहे पण त्याकडे दुर्लक्ष करून जो साधक सिद्धींच्या मागे लागतो, त्याचा सर्वनाश अटळ असतो. खरं म्हणजे वैराग्यफळापुढे ह्या सिद्धींचे महत्त्व गवताच्या पात्याएव्हढेही नाही. पण अविवेकाने ज्यांनी वैराग्यफळाचा त्याचा त्याग केला त्यांचा निश्चितच अध:पात होतो. खरं म्हणजे जेव्हढे म्हणून देह आहेत ते सर्व नश्वर आहेत तेथे सिद्धी शाश्वत कशा असतील? हे लक्षात घेऊन नीजहितासाठी योग्याने सिद्धी हाताशी लागल्या तरी त्यांचा त्याग करावा आणि केवळ आत्मा हा नित्य आहे हे जाणून विवेकी साधकाने स्वत:ला आत्माभ्यासात गुंतवून ठेवावे. माझे म्हणणे पटून, साधक सिद्धींचा त्याग करायला तयार होतील परंतु त्यांच्या उपभोगांचे आकर्षणच इतके जबरदस्त असते की, माझा उपभोग घे असे म्हणून त्या जणू पाठीमागेच लागल्या आहेत असे साधकाला वाटू लागते आणि अगदी गलितगात्र झाल्याप्रमाणे त्याचे अवसान गळून पडते.
क्रमश:








