बाजारपेठेसह उपनगरातही मनपाची कारवाई
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह खडेबाजारमधील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम रहदारी पोलीस खाते आणि महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली. यापाठोपाठ उपनगरातील अतिक्रमणे हटविण्याचा बडगा महापालिकेने उगारला आहे. सोमवारी सकाळी शुक्रवारपेठ मुख्य रस्त्याशेजारील अतिक्रमण तसेच खोकी हटविण्याची कारवाई केली. रहदारीस अडथळा ठरणारी खोकी तसेच फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रहदारी पोलीस खात्याने मनपाच्या सहकार्याने विशेष मोहीम मागील आठवड्यापासून हाती घेतली आहे. मध्यवर्ती बसस्थानक ते गणपती गल्ली कॉर्नरपर्यंतच्या खडेबाजार रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्याचप्रमाणे काही व्यावसायिकांनी दुकानासमोर जम्प्स् बसविले आहेत. तसेच बैठे व्यापारीदेखील रस्त्यावर पसारा करीत असल्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रहदारी पोलीस खात्याने अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील खोकीदेखील हटविली आहेत. त्यापाठोपाठ महापालिकेने आपली मोहीम टिळकवाडी भागात वळविली आहे. शुक्रवारपेठेतील मुख्य रस्त्याशेजारी ठिकठिकाणी खोकी थाटण्यात आली होती. याबाबत महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन सोमवारी खोकी हटविण्याची कारवाई महापालिकेने केली. रस्त्याशेजारी असलेले अडथळे याप्रसंगी हटविले. स्वच्छता निरीक्षक कलावती यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.









