अमेरिकेच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा ठाम निर्धार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया अमूलाग्र सुधारण्याचा निर्धार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी काही महत्वाच्या प्रशासकीय आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यापुढे अमेरिकेत मतदार म्हणून नाव नोंदणी करायची असेल तर सदर व्यक्तीला आपल्या अमेरिकन नागरिकत्वाचे कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतील. केवळ प्रतिज्ञापत्रावर काम भागणार नाही, असा आदेश ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, मतदानाच्या मुख्य दिवसाच्या आधी सर्व पोस्टल मतपत्रिका पोहचल्या पाहिजेत असा आदेशही त्यांनी काढला आहे. अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया बेशिस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. या बेशिस्तीमुळे अनेक त्रुटी आणि पळवाटा मतदान प्रक्रियेत निर्माण झाल्या असून त्या दूर केल्याशिवाय अध्यक्षीय निवडणुकांना अर्थच उरणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी मंगळवारी आपल्या एका वक्तव्यात केल्याने खळबळ उडाली आहे.
प्रामाणिकता महत्वाची
निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकता आणि पारदर्शित्व महत्वाचे आहे. सर्व प्रांतांनी ही पारदर्शिता जपावयास हवी आहे. पोस्टल पद्धतीने देण्यात आलेले प्रत्येक मत मतदानाच्या मुख्य दिवसापर्यंत संबंधित कार्यालयात पोहचण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर पोहचलेल्या मतांची गणना करण्यात येऊ नये, अशी सोय असावयास हवी. जी राज्ये या प्रक्रियेचे पालन करणार नाहीत. त्यांना संघराज्यीय कोषागारातून निवडणूक निधी दिला जाणार नाही, असाही नियम बनविण्याचा त्यांचा विचार आहे. हा आदेश त्यांनी अमेरिकेतील निवडणूक उपायुक्तांना पाठविला आहे.
भारताचे दिले उदाहरण
भारतात लोकसभेच्या निवडणुकीचे नियम आणि प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये समान आहे. इतर अनेक देशांमध्ये असे समान नियम आहेत. अमेरिकेत मात्र, प्रत्येक प्रांतात अध्यक्षीय निवडणूक घेण्याची प्रक्रिया भिन्न भिन्न आहे. त्यामुळे संशय निर्माण होतो आणि पारदर्शित्व रहात नाही. काही प्रांतांमधील नियम अस्पष्ट असल्याने तेथे या अस्पष्ट नियमांचा गैरलाभ उठविला जाऊ शकतो. त्यामुळे भारत, कॅनडा, जर्मनी आदी देशांप्रमाणे अमेरिकेतही अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया सर्व प्रांतांमध्ये समान असली पाहिजे. आपण त्यादृष्टीने पावले उचलणार आहोत. कठोर नियम बनविणार आहोत, असे प्रतिपादन ट्रम्प यांनी मंगळवारी केले.
मतदारसूचीतील घुसखोरी
विदेशातून अमेरिकेत आलेले अनेक लोक अमेरिकेचे नागरिकत्व न मिळविताच आपली नावे मतदारसूचित घुसडतात. कारण काही प्रांतांमध्ये नियम अत्यंत ढिले आणि अस्ताव्यस्त आहेत. अमेरिकेच्या घटनेनुसार अमेरिकेच्या नागरिकालाच अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करता येते. तथापि, हा नियम कित्येकवेळा पाळला जात नाही. परिणामी, निवडणूक प्रक्रिया संशयास्पद होत आहे. हे रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.









