गारगोटी/अनिल कामीरकर
देशभर ख्याती असलेल्या, भुदरगड तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेली मौनी विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यापीठात निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आश्रयदाते व सभासद मतदारसंघातून गव्हर्निंग कौन्सिल करीता दोन जागा तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मतदार संघातून एक जागा आहे. मौनी विद्यापीठावर गेली कित्येक वर्षे पालकमंत्री सतेज पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही त्यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.
२५ मे ते ३१ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, १ जून अर्ज छानणी, २ ते ९ जून अर्ज माघारी घेणे तर १९ जूनला मतदान व सायंकाळी मतमोजणी होणार आहे. यंदाची निवडणूक चुरशीची होणार की बिनविरोध होणार याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर जिह्याच्या दक्षिण पश्चिम भागातील अति दुर्गम असलेल्या भुदरगड तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कै. खासदार व्हि, टी. पाटील यांनी १९५७ ला गारगोटी येथे मौनी विद्यापीठ या संस्थेची स्थापना केली. स्थापनेनंतर वीस वर्षे विद्यापीठाने भुदरगड तालुक्याच्या ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था सुरु करुन चित्र पालटून टाकले. कालांतराने मौनी विद्यापीठात पालकमंत्री सतेज पाटील अध्यक्ष झाले, मात्र गेली काही वर्ष विद्यापीठ स्थानिक कारभाऱयाच्या वागुणुकीमुळे सतत वादातीत असते. पण त्याचे खापर मात्र मंत्री सतेज पाटील यांच्यावर फोडण्यात येते.
मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांचे विद्यापीठ विकासासाठी भगीरथ प्रयत्न असतात. मात्र येथील बगलबच्चे कारभारी सातत्याने त्यात आडकाठी निर्माण करत असतात. पालकमंत्री पाटील यांच्याविरोधात तालुक्यातील राजकीय गटामध्ये नाराजीचा सूर असला तरी निवडणूक लढवण्यापर्यंत त्यांच्यात ऐक्य टिकत नाही, या सर्वच गोष्टी सतेज पाटील यांच्या पथ्यावर पडतात. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार की बिनविरोध होणार याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिले आहे.